कोकणातील शेतकऱ्यांसाठी खूषखबर! वाचा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

या प्रकल्पाअंतर्गत कणकवली तालुक्‍यातील 30, कुडाळ तालुक्‍यातील 8 मालवण तालुक्‍यातील 10 गावांमधील जवळपास 8 हजार 84 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली आणि कुडाळ तालुक्‍यातील 53 गावांना सिंचनासाठी पाणी पोहचवण्याची क्षमता असलेल्या नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाचा हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. 

कणकवली तालुक्‍यातील नरडवे येथे मध्यम पाटबंधारे प्रकल्प 2001 पासून कामाला सुरुवात झाली; मात्र सध्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी हे काम थांबलेली आहे; मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाचा दाखला मंजूर केल्याने आता या प्रकल्पाचा मुख्य अडथळा दूर झाला आहे. नरडवे धरणाची एकूण लांबी 1749 मीटर तर उंची 66 मीटर आहे. या प्रकल्पांमध्ये 3 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत कणकवली तालुक्‍यातील 30, कुडाळ तालुक्‍यातील 8 मालवण तालुक्‍यातील 10 गावांमधील जवळपास 8 हजार 84 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या प्रकल्पातील 10. 606 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची घरगुती वापरासाठी तर 5.958 दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याचे औद्योगिक वापरासाठी नियोजन आहे. या प्रकल्पाला 1986-87 ला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तेव्हा प्रकल्पाचा खर्च 32 कोटी होता. त्यानंतर 1993-94 सुधारित मान्यता मिळाली आणि प्रकल्पाची किंमत 102 कोटीवर पोहोचली. चौथ्या मान्यतेनुसार फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्र शासनाकडून निधी मिळाला आणि या प्रकल्पाची आत्ता किंमत 1 हजार 84 कोटीवर पोहचली आहे. धरणाच्या माती कामाचे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

11 केटीवेअरचे काम पूर्ण 
कोल्हापुरी पद्धतीच्या प्रस्तावित 14 पैकी 11 केटीवेअरचे काम पूर्ण झाले आहे. धरण प्रकल्पामध्ये 885 हेक्‍टर जमीन खाजगी संपादित करण्यात आली आहे. तर सरकारी वनजमीन ही 11. 25 हेक्‍टर आहे तसेच 34 हेक्‍टर वनसंज्ञा आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी सांगवे संभाजीनगर येथे बाधित कुटुंबांसाठी गावठाणाची सुविधा करण्यात येत आहे. तर दिगवळे गावठाण येथे नरडवे, भैरवगाव, यवतेश्वर मधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणार आहे. दुर्गानगरमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे कुडाळ तालुक्‍यातील जांभवडे गावठाणामध्ये होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government permission to Nardave project