आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अनाथ मुलींना सरकारचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

- आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला सरकारचा दिलासा.
- मुख्यमंत्र्यांची व्यक्तीगत पातळीवर सहा लाखांची मदत. 
- दोन मुलींना शिक्षणासाठी आश्रमशाळेत प्रवेश. 
- नातेवाईकांच्या संमतीने लहान मुलीस बालसुधारगृहात पाठविणार  
- आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांची माहिती.

मोखाडा : जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा येथील रूक्साना हांडवा हिने पतीच्या आत्महत्येनंतर महिनाभरात दोन मुलींना विष पाजुन आत्महत्या केल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी व्यक्तिगत पातळीवर या घटनेतील तीन मुलींना प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. गावात शिक्षण घेत असलेल्या निराधार दोन मुलींना तातडीने शिक्षणासाठी सरकारी आश्रमशाळेत प्रवेश दिला असून सात महिण्याच्या लहान मुलीस नातेवाईकांच्या संमतीने बालसुधारगृहात पाठवणार असल्याची माहिती आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जव्हार येथे दिली आहे. 

जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा येथील रूक्साना हांडवा या आदिवासी विधवा महिलेने आपल्या पतीच्या आत्महत्येनंतर, कुटूंबाचा भार झेपवत नसल्याने, गरीबीला कंटाळून दोन मुलींना विष पाजुन आत्महत्या केली आहे. रूक्सानास चार मुली आहेत. मोठ्या दोन मुली शाळेत गेल्यानंतर तीने हे कृत्य केले होते. यामध्ये रूक्साना आणि तीन वर्षाची दिपाली मृत्यू पावली आहे तर, सात महिण्याचे बाळ मात्र डॉक्टरांच्या उपचारानंतर जिवंत राहिले आहे.

 या घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या आदेशानुसार आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी पिंपळशेत खरोंडाचा दौरा केला आहे. त्यांनी प्रथम जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सात महिण्याच्या लहान मुलींची पाहणी केली आहे. त्यानंतर खरोंडा येथे जाऊन सुमत (9) आणि जागृती (6) या दोन मुलींसह तीच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. तसेच या कुटुंबाच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या भागात रोजगार हमीच्या  कामांना गती देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government relief to orphan girls from the family of suicide

टॅग्स