पाचवीचे वर्ग जोडणार जवळच्याच शाळांना, काय आहे शासन धोरण?

तुषार सावंत
Saturday, 5 September 2020

प्राथमिक शाळांतील 1 ते 5 प्राथमिक आणि उच्च प्राथमिकसाठी 6 ते 8 या गटातील पदांसाठी केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. या निकषानुसार हा बदल केला जाणार आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळातील शिक्षक संवर्गातील पदे निश्‍चित केली जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक शाळांमधील पाचवीचे वर्ग जवळच्या एक किलोमीटर अंतरावरील चौथीपर्यंत असलेल्या शाळांना जोडले जाणार आहे. 

प्राथमिक शाळांतील 1 ते 5 प्राथमिक आणि उच्च प्राथमिकसाठी 6 ते 8 या गटातील पदांसाठी केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. या निकषानुसार हा बदल केला जाणार आहे. माध्यमिक शाळांमध्ये पूर्वी विशेष शिक्षक स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येत होते. त्यानुसार क्रीडा, कला आणि कार्यानुभव शिक्षक प्रस्तावित करण्यात येत आहेत. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व परिवेक्षक पदासाठी सध्या असलेल्या निकषांमध्ये बदल करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.

नव्या धोरणानुसार संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत असेल तरी अशा शिक्षकांना शाळेतील विद्यार्थी वाढीसाठी पुढील शैक्षणिक वर्षासाठी संधी देण्याबाबतही प्रस्तावित आहे. कमी पटसंख्येच्या शाळांबाबत पूर्वीच्या तरतुदीनुसार सरासरी उपस्थिती झाल्यास अनुदान बंद करणे अथवा शिक्षार्थ कपात करण्याची तरतूद होती; परंतु सरासरी पटसंख्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील 15, खाजगी अनुदानित प्राथमिकसह उच्च प्राथमिक वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये 20, खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांतील 25 पेक्षा कमी असेल तर अशा शाळा पाच किलोमीटर परिसरातील संबंधित जवळच्या शाळांमध्ये सोडल्या जातील.

शाळेतील स्थायी शिक्षकांच्या पदासह समायोजन केले जाणार आहे. कमी पटसंख्येच्या शाळा चालवायच्या असल्यास संबंधित संस्थेला स्वंय अर्थसाहित तत्त्वावर त्या चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे. पटसंख्या वाढीसाठी दोन शैक्षणिक वर्षात संधी दिली जाईल, असेही नव्या परिपत्रकात नमूद केले आहे. 
सध्य स्थितीत मात्र 2019-20 वर्षाच्या संचमान्यता झाल्या नसल्याने आता शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू झाल्यामुळे 2018-19 या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेली पदे 2019-20 विचारात घेऊन सुधारित निकषाप्रमाणे 2020-21 शैक्षणिक वर्षापासून लागू केले जाणार आहे. 
 

पुढील वर्षांपासून बदल 
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींचा विचार करून, ज्या माध्यमिक शाळा पाचवी वर्गापासून आहेत, त्या शाळांतील पाचवी वर्ग नजीकच्या एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळेत जोडण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाचा आहे. यानुसार पुढील 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून हा बदल केला जाणार आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government's new education policy for class V.