कोकण: ग्रामपंचायतीत उलथापालथ ; शिवसेनेचा भाजपला ‘दे धक्का’

gram panchayat election Bjp vs shivsena result ratnagiri political  marathi news
gram panchayat election Bjp vs shivsena result ratnagiri political marathi news

रत्नागिरी :  तालुक्यातील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल पुढे आले. शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहेच; मात्र काही सेनेच्या महत्वाच्या ग्रामपंचायती भाजपने खेचून घेतल्या. त्यामध्ये वाटद, कासारी, नांदिवडे, मिर्‍या ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर कोतवडे ग्रामपंचयातीमध्ये शिवसेनेने भाजपला ‘दे धक्का’ देत सर्व 5 सदस्य आपल्या बाजुला वळवून ही ग्रामपंचायत आपल्याकडे राखली. 

वाटद देखील भाजपने खेचून आणली.
तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायत ही वाटद जिल्हा परिषद गटातील लक्षवेधी ग्रामपंचायत ठरली होती. शरद बोरकर विरुद्ध शिवसेना असा सामना या ठिकाणी झाला. सर्वांत मोठा फटका भाजपला या ग्रामपंचायतीत बसला. सर्व जागा शिवसेनेने मिळविल्या. वरवडेत भाजपचे पानिपत झाले . काही नेत्यांची प्रतिष्ठादेखील पणाला होती; वरवडेचा वचपा काढायचाच, असा चंग बांधून भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी वाटद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गडात थेट हात घातला. 

वाटद जिल्हा परिषद गट हा पूर्वापार शिवसेनेचा गड; मात्र या वेळी चित्र वेगळे होते. भाजपने या ठिकाणी शिवसेनेचे दोन सदस्य फोडले अन या ग्रामपंचायतीवर कब्जा केला. सरपंचपदी अंजली विभुते तर उपसरपंचपदी सुप्रिया नलावडे विराजमान झाले.कासारी ग्रामपंचायतीत शिवसेनेला फाजील आत्मविश्‍वास घातक ठरला. वाटद पाठोपाठ कासारीही शिवसेनेच्या हातून गेली. दर्शना बेनेरे सरपंचपदी तर संदेश महाकाळ उपसरपंचपदी विराजमान झाले. नांदिवडे ग्रामपंचायत ही सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. 

विवेक सुर्वे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता; सुर्वेंनी अपक्ष उमेदवाराच्या मदतीने या ग्रामपंचायतीवर पुन्हा वर्चस्व मिळविले.आर्या गडदे सरपंचपदी तर विवेक सुर्वे उपसरपंचपदी विराजमान झाले. कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये सेनेने भाजपला जोरदार धक्का दिला. अकरा जागांपैकी पाच-पाच जागा दोन्ही पक्षाकडे होत्या. आयत्यावेळी भाजपच्या पाचजणांनी सेनेला मदत केल्याने तेथे सेनेचा सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे विराजमान झाले.  


आणि भाजपचे फावले 

मिर्‍यात अटीतटीची लढत झाली. शिवसेनेचे 5, भाजपचे 4 व 2 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. अपक्षाच्या मदतीने शिवसेना सरपंच बसवेल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेतच सरपंचपदासाठी तू-तू मै-मै सुरू झाली. त्यामुळे उमेदवारी कोणाला, असा पेच निर्माण झाला. अखेरच्या क्षणी आकांक्षा नीलेश कीर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपची वाट धरली. त्या सरपंच आणि उपसरपंचपदी उषा कांबळे यांची निवड झाली.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com