नव्या चेहऱ्यांमुळे मळगावात रंगत

gram panchayat election malgao konkan sindhudurg
gram panchayat election malgao konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या 15 रोजी मतदान होणार असल्याने तालुक्‍यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी मळगाव ग्रामपंचायत ओळखली जाते. यंदाच्या निवडणुकीत 33 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी तब्बल 29 नवे चेहरे निवडणूक लढवत असल्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. 

जिल्ह्यातील पहिले रेल्वे टर्मिनस आणि मुंबई-गोवा महामार्ग गेल्यामुळे या गावाला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही दशकात या गावाचा आर्थिक विकासही होऊ लागला आहे; मात्र स्थानिक प्रश्‍न व सुविधांकडे अद्यापही काहीसे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती तर सोबत कॉंग्रेसमधील 3 सदस्य कार्यरत होते. तब्बल 4517 एवढी लोकसंख्या तर 13 सदस्य असलेलेही ग्रामपंचायत असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनेही या गावातील मतदाराला मोठे महत्त्व आहे.

सध्याच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत मळगाव विकास आघाडी तर शिवसेनेचे उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहेत. यासोबतच 7 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. काही अपक्ष उमेदवारांजवळ अनुभव असल्याने काही शिवसेनेचे व भाजपचे नवखे उमेदवार त्यांना टक्कर देणार आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ हे शिवसेनेच्या तिकिटावर मळगाव पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे मळगावची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. 

मळगाव माजी सरपंच गणेश पेडणेकर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सदस्य जास्त असतानाही भाजपचा सरपंच बसला होता; मात्र त्यांना पायउतार करताना वेगळी राजकीय खेळी दिसून आली होती. त्यामुळे या निवडणुकीत नेमके राजकीय समीकरणे काय असणार? हे सांगणे आत्ताच कठीण आहे. असे असले तरी मळगावात शिवसेनेचा दबदबा जास्त दिसून येत आहे; मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद व इतर निवडणुकांसाठी ग्रामपंचायत खेचून आणण्यासाठी भाजपचेही शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

यात माजी पंचायत समिती सभापती राजू परब व भाजपचे इतर कार्यकर्ते सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तब्बल 20 वस्तीच्या या गावातून प्रभाग 1 मधून स्नेहल जामदार, निलेश चव्हाण, प्रेमनाथ राऊळ हे उमेदवार भाजप पुरस्कृत तर मयुरी शिरोडकर, आनंद देवळी, संजय धुरी हे उमेदवार शिवसेनेकडून रिंगणात आहेत तर गुरुनाथ गावकर, वैष्णवी राणे, विश्‍वनाथ राऊळ हे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यातील आनंद देवळी आणि गुरुनाथ गावकर हे अनुभवी उमेदवार रिंगण असून ते आदी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते.

प्रभाग 2 मधून रत्नमाला तळकटकर आणि मृणाली लातये यांच्यासमोर निकिता सावळ आणि निकिता बुगडे या भाजप पुरस्कृत उमेदवारांचे तगडे आव्हान राहणार आहे. प्रभाग 3 मध्ये हनुमंत पेडणेकर आणि निकिता राऊळ हे भाजप पुरस्कृत उमेदवार असून त्यांच्यासमोर विजय हरमलकर, श्रेया राऊळ हे शिवसेनेचे उमेदवार आव्हान देणार आहेत. या दोन्ही प्रभागात शिवसेना विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

प्रभाग 4 मध्ये 3 जागांसाठी तब्बल 11 उमेदवार रिंगणात असून अनुजा खडपकर, सुभद्रा राणे आणि रामदास राऊळ हे भाजप पुरस्कृत तर सुजाता महाले, लक्ष्मण गावकर आणि वेदिका शिरोडकर या शिवसेनेकडून रिंगणात आहेत. रागणी शिरोडकर, गोविंद कानसे, साईप्रसाद खडपकर, सिद्धेश तेंडुलकर, असे चार अपक्ष उमेदवार आव्हान देण्यास सज्ज आहेत. प्रभाग 5 मध्येही शिवसेना विरुद्ध भाजप पुरस्कृत उमेदवार अशी लढत पाहायला मिळणार असून चंद्रकांत जाधव, लक्ष्मण सावळ आणि संध्यावल्ली राऊळ हे भाजप पुरस्कृत उमेदवार तर लाडू जाधव, तुकाराम सावळ आणि स्वरूपा राऊळ हे शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. जाधव विरुद्ध जाधव, सावळ विरुद्ध सावळ आणि राऊळ विरुद्ध राऊळ अशी लढत होणार आहे. 

कौल कुणाला? 
मळगावमध्ये पक्षापेक्षाही उमेदवाराच्या वागणुकीला आणि कामाला महत्त्व देण्यात येते. त्यामुळे इथला मतदार जागृत समजला जातो. त्यामुळे कोणाच्या बाजूने मतदारांचा कौल वळणार?, निवडणुकीनंतर नेमके चित्र काय असणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

गावची लोकसंख्या ः 4517 
सरासरी मतदान ः 70 ते 75 टक्के 
सदस्य संख्या एकूण ः 3  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com