शिवसेना - भाजपची प्रतीष्ठा मालवणात पणाला

प्रशांत हिंदळेकर
Saturday, 16 January 2021

गेले काही दिवस दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रभावी प्रचारयंत्रणा राबविल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाच्या प्रक्रियेस शांततेत सुरवात झाली. सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदानाची प्रक्रिया सुरू होती. सहा ग्रामपंचायतीच्या 54 जागांसाठी 109 उमेदवार निवडणूक रिंगणात असून ते आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुपारी दीड वाजेपर्यत 52.74 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली. 

तालुक्‍यातील खरारे-पेंडूर, कुणकवळे, चिंदर, मसदे-चुनवरे, आडवली-मालडी, गोळवण-कुमामे-डिकवल या सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यातच खरी लढत होत असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेले काही दिवस दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रभावी प्रचारयंत्रणा राबविल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सहा ग्रामपंचायतीच्या 19 मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदानाच्या प्रक्रियेस सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रावर मतदानास येणाऱ्या मतदारांची प्रशासनाकडून थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी केली जात होती. सामाजीक अंतर ठेवून मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. कोणत्याही मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीची समस्या भासली नाही. तालुक्‍यातील चिंदर व खरारे-पेंडूर या दोन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका शिवसेना-भाजप पक्षाने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी सकाळपासूनच ठाण मांडून बसल्याचे चित्र होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सकाळच्या सत्रात काही ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर काही मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान सुरू असल्याचे दिसून आले. वृद्ध मतदारांना मतदानाच्या ठिकाणी मतदानासाठी आणण्यात येत होते. सकाळी साडे अकरा वाजेपर्यत 32.53 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी दीड वाजेपर्यंत 52.74 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election malvan taluka