''शिवसेनेला चोख उत्तर देत दक्षिण रत्नागिरीत भाजपने केले परिवर्तन'' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

आरक्षण जाहीर झाल्यांनतर आणखी सरपंच व ग्रामपंचायती मिळवू

रत्नागिरी - आम्ही भाजपला सहज हरवू शकतो या शिवसेनेच्या दाव्याला मतदारांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोख उत्तर देत सेनेला जागा दाखवली आहे आणि यातूनच रत्नागिरी फक्त त्यांचीच नाही हेही सिद्ध झाले आहे, अशा शब्दात भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. दक्षिण रत्नागिरीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत २९६ सदस्य निवडून आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. 

शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा मतदार आणि कार्यकर्त्यांवर दडपण आणले.  तरीही आमचे उमेदवार दबले नाहीत. सेनेसमोर ठामपणे उभे राहिले आणि सेनेला आडवे केले. कोकणाने सेनेला भरभरून दिले पण सेनेने कोकणला काहीही दिले नाही, त्याचेच हे निकालातून प्रत्युत्तर असून आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. सरपंच आरक्षण जाहीर झाल्यांनतर आणखी सरपंच व ग्रामपंचायती मिळवू, असे निलेश राणे यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल सुरु झाल्यानंतर माध्यमांतून भाजपचा पराभव अशा स्वरूपाच्या सकाळपासून चुकीच्या बातम्या येत होत्या असे सांगत राणे यांनी यावर नाराजी व्यक्त करून दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच भाजप पुरस्कृत 296 सदस्य निवडून आल्याचे सांगितले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कुठे दिसले नाहीत, भाजप विरुद्ध सेना असा सामना झाला. सेनेचे या जिल्ह्यात खासदार, आमदार, मंत्री असूनही भाजपचे एवढे सदस्य निवडून येणे ही कामगिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे टीम वर्क आहे. अनेक सदस्य गावपॅनेल म्हणून भाजपकडे वळत आहेत. बळाचा वापर केला तरी रत्नागिरीत भाजपचे 70 हून अधिक सदस्य निवडून आले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री येथे ठाण मांडून बसले तरीसुद्धा मतदारांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाजप पुरस्कृत सदस्य निवडून दिले. 25 ला सरपंचपदाचे आरक्षण पडल्यानंतर आणखी सरपंच, ग्रामपंचायती वाढतील. आम्ही अजून मैदान सोडलेले नाही, असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला. 

हे पण वाचारत्नागिरी : बोट उलटल्याने बुडून तीन जणांचा मृत्यू

 

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, राजेश सावंत, अ‍ॅड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat result 2021 maharashtra ratnagiri nilesha rane