
मंडणगड (रत्नागिरी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात असणारे मुळगाव आंबडवे येथे संविधानिक नियमांचे काटेकोर पालन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. १४ एप्रिल आंबेडकर जयंती निमित्त देशभरातून नागरिक नतमस्तक होण्यासाठी आंबडवे येथे येतात. मात्र शासनाच्या आदेशाचे पालन करत आंबडवे येथील बाबासाहेबांच्या मूळघरावर बांधण्यात आलेल्या स्मारकातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
बाबासाहेबांच्या बालपणातील काही काळ आंबडवे येथे गेला आहे. वडिलांचे वडिलोपार्जित घर होते. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने स्मारक बांधण्यात आले असून त्याठिकाणी अर्धाकृती पुतळा व अस्थीकलश ठेवण्यात आला आहे. केंद्रशासनाने आंबडवेचा पंचतीर्थ म्हणून समावेश केला आहे. १४ एप्रिल जयंतीनिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी नतमस्तक होण्यासाठी येताता. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन आणि संचार बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून नियमांची कडक अमलबजावणी सुरू आहे. त्याला आंबडवेकरांनी साथ दिली आहे.
बापानेच नियम लिहिलेत आम्ही मोडणारे कोण?
जयंतीनिमित्त आंबडवे येथे परिस्थितीचा मागोवा घेतला असता, परिसरात सर्वत्र शांतता दिसून आली. आंबडवेचे ज्येष्ठ ग्रामस्थ व अभ्यासक सुदामबाबा सकपाळ यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी सकपाळ म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. त्यावर संपूर्ण देशाचा कारभार सुरू आहे. त्याला अनुसरूनच सध्या नियमांची अमलबजावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी घालून दिलेला आदर्श आम्ही मोडू शकत नाही. आंबेडकर अनुयायी व नागरिकांनी याचे पालन केले आहे. कारण बापानेच नियम लिहिलेत मोडणारे आम्ही कोण? असे म्हणत बाबासाहेब सर्वांच्या मनात असून येथे येवून नतमस्तक झालो काय आणि घरी झालो काय एकच. त्यांच्या प्रति असणारी आस्था महत्वाची. तसेच राज्यभरातून अनुयायीचे फोन येत असून याठिकाणची चौकशी केली जात आहे.
आंबडवे बाबासाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय स्थळ
डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय स्थळ म्हणजे मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे गाव होय. अतिशय कमी लोकवस्ती असलेले हे बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव. बाबासाहेबांच्या बालपणातील काही काळ येथे गेला आहे. इथे सकपाळ कुटुंबीय वास्तव्य करून राहते. या सकपाळ घराण्यातीलच डॉ.आंबेडकर. खरे तर त्यांच्या आडनावाची कहाणी मोठी रंजक आहे.
बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ. नंतर त्यांच्या वडीलांनी बाबासाहेबांचे आडनाव सातारा येथील प्रतापसिंह शाळेत आंबाडवेकर असे ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. आजही ७ नोव्हेंबर हा शाळा दिवस ‘शाळा प्रवेश दिन’ म्हणून साजरा होतो. आजही शाळेत बाबासाहेबांचे नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पाहावयास मिळते. आंबडवेत त्यांच्या जुन्या घरावर स्मारक बांधण्यात आले असून परिसरात अशोक स्तंभ आणि शीलालेख उभारून त्याला स्फूर्तिभूमी असे नाव दिले आहे. पंचतीर्थ म्हणून घोषित झालेल्या आंबडवे गावाचा आदर्श संसद ग्राम योजनेत समावेश करण्यात आला आहे.
घरीच अभिवादन; सोशल मीडियावर वैचारिक चर्चा
तालुक्यात नागरिकांनी बाबासाहेबांना घरीच वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. घरातच कुटुंबासमवेत विविध उपक्रम राबविले. तसेच सोशल मिडियावर बाबासाहेबांच्या जीवनातील घटना, त्यांनी दिलेले योगदान, त्यांचे कर्तृत्व, शिक्षण यावर चर्चा घडवून आणण्यात आल्या. त्यामुळे वैचारिक मंथन घडून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.