का घाबरता : मुख्यमंत्री किती कोटीचा निधी देणार ते जाहीर करा : प्रसाद लाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

आमदार; पालकमंत्री परब, सामंत यांच्या टिकेचा समाचार

रत्नागिरी :  मुख्यमंत्र्यांनी दापोली-मंडणगडसाठी कोट्यवधी म्हणजे नक्की किती कोटींचा निधी देणार त्याचा आकडा रत्नागिरीचे पालकमंत्री परब आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी जाहीर करावेच.एकूण नुकसानीपैकी 117 कोटींचा निधी प्राप्त झाला, असे सांगत असाल तर नक्की नुकसान किती हजार कोटींचे झाले ते जाहीर करायला का घाबरता? असे प्रतिआव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले.

बागायतदारांच्या झाडांना महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी लावलेले निकष लावून नुकसान भरपाई द्या, ही भाजपची मागणी केराच्या टोपलीत गेली. यावरूनच राजकारण कोण करतंय आणि प्रत्यक्ष मदत कोण देतंय ते जनतेला समजले आहे. भाजपने चौदा ट्रक मदत दापोली मंडणगड आणि रायगड जिल्ह्यात केली.

हेही वाचा- चिपळूणमध्ये रस्त्यावर दरड कोसळली ; हा मार्ग बंद , किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू -

चक्रीवादळग्रस्तांचे महिना झाला तरी पंचनामे झालेले नाहीत. आता पावसात लोकांनी समुद्रात राहायचं का, इथे ‘स्थगिती’ चालणार नाही म्हणून ‘संथगती’ अवलंबली आहे, अशी टीकाही प्रसाद लाड यांनी केली. पंचनामे लवकर होण्यासाठी भाजपाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने सूचना केल्या. त्याचा विचार सत्ताधार्‍यांनी केला नाही. उन्मळून पडलेल्या एका नारळ, माड, पोफळीच्या झाडापासून मिळणारे उत्पन्न बंद झाले म्हणजे पुन्हा उत्पन्न सुरू व्हायला दहा वर्षे लागतील. आंब्याच्या कलमाला पाच ते सहा वर्षे. नुकसान भरपाईची रक्कम कलमाची बाग साफ करायला तरी उपयोगी पडणार आहे का? असा सवालही लाड यांनी केला.

हेही वाचा-ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले ३१ कोरोना पॉझिटिव्ह.... -

मंत्री घरात बसले

पालकमंत्री परब यांनी कोरोना संकटाच्या तीन महिन्यात फक्त दोनदा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. दोन-चार दिवसांनी मुंबईत आलो की परीक्षेसंदर्भात निर्णय नक्की घेतला जाईल, असे म्हणत घरात बसणार्‍या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी रस्त्यावर उतरून उत्तर देण्याच्या गमजा मारू नयेत. ते जेव्हा घाबरून घरात बसले होते तेव्हा भाजपाचेच कार्यकर्ते आणि आमदार रस्तोरस्ती फिरून कोरोना किंवा चक्रीवादळग्रस्तांना उंबरठ्यापर्यंत जाऊन मदत करत होते, असा टोलाही लाड यांनी हाणला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister of Ratnagiri Parab and Minister of Higher and Technical Education of the state To be declared Funding amount in mandangad dapoli