नरडवे प्रकल्पग्रस्तांसाठी आनंदाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

नरडवे प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्‍न मार्गी लागणे आवश्‍यक असल्याचे सांगून पालकमंत्री सामंत म्हणाले, की प्रकल्पग्रस्तांनी व प्रशासनाने समन्वयाने सर्व प्रश्‍न मार्गी लावावेत.

कनेडी (सिंधुदुर्ग) - नरडवे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठीच आज बैठकीचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. नरडवे येथे आज आयोजित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबतच्या बैठकीवेळी ते बोलत होते. 

या वेळी आमदार वैभव नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मकरंद म्याकल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी अध्यक्ष संदेश पारकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने आदी उपस्थित होते. नरडवे प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्‍न मार्गी लागणे आवश्‍यक असल्याचे सांगून पालकमंत्री सामंत म्हणाले, की प्रकल्पग्रस्तांनी व प्रशासनाने समन्वयाने सर्व प्रश्‍न मार्गी लावावेत.

प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप होणार आहे. ते प्रकल्पग्रस्तांनी ताब्यात घ्यावेत. जे शेतजमिनीचे वाटप होणार आहे, त्याविषयी जमिनीऐवजी पैशाच्या स्वरूपात मोबदला घेण्याची तयारी असल्यास याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा. मोबदल्याचे वाटप गावातच व्हावे, यासाठी प्रशासनाने गावात कॅम्प आयोजित करावा. शेतजमिनीच्या मोबदल्यात पैशांचे वाटप करण्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवावी व या बैठकीत तो प्रश्न मार्गी लावावा.

या मोबदला वाटपात ज्या प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वी 65 टक्के रक्कम भरली आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. मोबदला मिळत नाही तोपर्यंत गाव खाली करणार नाही, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेऊन भूखंडाचे वाटप सुरू आहे, ते भूखंड ताब्यात घ्यावेत. प्रशासनाने वारसदार, मुंबईकर, जिथे कोणताही वाद नाही व वाद असणाऱ्या चार प्रकारच्या याद्या तयार कराव्यात व त्याप्रमाणे निवाडा करावा. प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव कुटुंबांच्या यादीला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. 

जुलैअखेरपर्यंत यादी तयार 
या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी प्रकल्पग्रस्तांची माहिती सादर केली. तसेच, यापूर्वी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कार्यवाही सुरू असल्याचेही सांगितले. मोबदल्याचे वाटप सुरू असून, भूखंड वाटपाची यादीही तयार आहे. 31 जुलैपर्यंत हे अंतिम होईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीपूर्वी पालकमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांसह नरडवे धरणाची सविस्तर पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister's decision to help Nardve project victims