मार्लेश्वर गिरीजादेवी कल्याणविधीसाठी वऱ्हाडी मारळ नगरीत  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guest For Marleshwar Girijadevi Marriage Reach In Maral Ratnagiri Marathi News

श्री देव मार्लेश्‍वर, यजमान श्री देव वाडेश्‍वरची पालखी शिखराकडे रवाना झाली. बुधवारी (ता.15) दुपारपर्यंत सर्व विधी आटोपून 360 मानकऱ्यांना निमंत्रण दिल्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर श्री देव मार्लेश्‍वर आणि साखरप्याची श्री देवी गिरिजाचा विवाह सोहळा (कल्याण विधी) पार पडेल.

मार्लेश्वर गिरीजादेवी कल्याणविधीसाठी वऱ्हाडी मारळ नगरीत 

साडवली ( रत्नागिरी ) - सह्याद्रीचा कैलास अशी ख्याती असलेल्या आणि सह्याद्रीच्या कपारीतील एका गुहेत वसलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्‍वरचा वार्षिक यात्रोत्सव 13 तारखेपासून धूमधडाक्‍यात सुरू झाला. कल्याणविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून वऱ्हाडी मोठ्या संख्येने मारळ नगरी मार्लेश्वरला दाखल झाले आहेत. 

मंगळवारी ( ता. 14) संध्याकाळी आंगवली येथील मूळ मठात वार्षिक यात्रोत्सव पार पडला. त्यांनंतर श्री देव मार्लेश्‍वर, यजमान श्री देव वाडेश्‍वरची पालखी शिखराकडे रवाना झाली. बुधवारी (ता.15) दुपारपर्यंत सर्व विधी आटोपून 360 मानकऱ्यांना निमंत्रण दिल्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर श्री देव मार्लेश्‍वर आणि साखरप्याची श्री देवी गिरिजाचा विवाह सोहळा (कल्याण विधी) पार पडेल. लिंगायतशास्त्रीय धर्मानुसार पंचकलशांची मांडणी करून हा विवाह होणार आहे. साक्षात परमेश्‍वराचा विवाह सोहळा यांची डोळा पाहण्यासाठी आजपासूनच मारळनगरीत भाविकांचा मेळा जमला आहे. हर हर मार्लेश्‍वरचा गजर सह्याद्रीच्या कपारीत घुमत आहे. 

हेही वाचा - लयभारी ! श्री मार्लेश्वरवारी करणारा असाही दिव्यांग भक्त

कल्याणविधी सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन, आरोग्यविभाग, बांधकाम विभाग, महावितरण, मारळ ग्रामपंचायत, मार्लेश्वर देवस्थान तसेच विविध सामाजिक सेवासंस्थांचे योगदान मिळत आहे. कल्याणविधी सोहळा सर्वांना पाहता यावा, यासाठी देवस्थानकडून स्क्रीनची व्यवस्था केली आहे. वॉकीटॉकीद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. यात्रोत्सवात पोलिस यंत्रणेला देवरुख राजू काकडे हेल्प ऍकॅडमीने सहकार्य केले.

हेही वाचा - मुलीकडचे म्हणून कोंडगावकरांकडे दुर्लक्ष नको 

श्री मार्लेश्वर देवस्थानचे अध्यक्ष महादेव लिंगायत, सचिव शाम लिंगायत, विश्वस्त व पुजारी यांनी यात्रोत्सवात व कल्याणविधी सोहळ्यासाठी जमलेल्या भाविक वऱ्हाडींसाठी चांगले नियोजन केले आहे. मारळ ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश गोरुले, पोलिस पाटील देवदास सावंत, विश्वस्त सुनील लिंगायत यांचेही योगदान लाभले आहे.