esakal | हरित लवादाच्या आदेशामुळे `या` किनाऱ्यावरील जेटीवर पडला हातोडा 
sakal

बोलून बातमी शोधा

Guhagar Jetty Demolished On Order Of Green Arbitration

दृष्टिक्षेपात... 
80 लाख खर्च करून उभारली 
पहिल्याच पावसात जेटीला तडे 
समुद्रकिनारा, पर्यावरणाची हानी 
कासव संवर्धन उपक्रमाला त्रास 
सीआरझेडच्या उल्लंघनाचा ठपका 

हरित लवादाच्या आदेशामुळे `या` किनाऱ्यावरील जेटीवर पडला हातोडा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुहागर ( रत्नागिरी ) - तीन सी व्ह्यू गॅलरी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला आज (ता. 31) सुरवात झाली. सीआरझेड एकमध्ये केलेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते. या आदेशांच्या अंमलबजावणी अंतर्गत हे जेटी तोडण्याचे काम पतन विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे. 

गुहागरमधील पर्यटन व्यवसाय वाढावा म्हणून तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री व सध्याचे आमदार भास्कर जाधव यांनी समुद्रकिनाऱ्यावर तरंगती (फ्लोटिंग) जेटी बांधण्याची कल्पना मांडली होती. मात्र तरंगती जेटी बांधण्यासाठी विशिष्ट रचनेतील जागा गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर नाही. त्यामुळे स्थायी (सॉलिड) जेटीचा प्रस्ताव मे 2013 मध्ये मंजूर केला. 80 लाखांचा निधी उपलब्ध झाल्यावर पतन उपविभाग, दापोलीच्या देखरेखीखाली सॉलिड जेटीच्या कामाला सुरवात झाली. 2014 मध्ये हे काम पूर्ण झाले; मात्र 2014च्या पहिल्याच पावसाळ्यात जेटीला तडे गेल्याने या जेटीचा वापर शासनाने बंद केला.

जेटीच्या बांधकामात पर्यावरण, प्रदूषण संदर्भात परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. ही बाब लक्षात आल्यावर बळवंत परचुरे यांनी 2017 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे अपील केले. त्यानंतर हरित लवादाच्या समितीने गुहागर समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन जेटीची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या अहवालात जेटीमुळे समुद्र किनाऱ्याचे, कासव संवर्धन उपक्रमाचे तसेच पर्यावरणाची हानी झाल्याचे नमूद केले. त्यामुळे हरित लवादाने सीआरझेडचे उल्लंघन करून केलेली बांधकामे तोडण्यात यावीत, असे आदेश महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन समितीने (एमसीझेडएमए) दिले होते. या आदेशांच्या अंमलबजावणीला आजपासून सुरवात झाली. या वेळी पतन उपविभाग दापोलीचे उपअभियंता लक्ष्मण तनपुरे, कनिष्ठ अभियंता अमोल कांबळे, राकेश जाधव उपस्थित होते. 
 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांप्रमाणे जेटी तोडण्यास सुरवात केली आहे. जेटीचे बांधकाम ब्रेकर वापरून फोडावे लागणार असल्याने संपूर्ण जेटी तोडण्यास 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागेल. जेटी तोडल्यानंतरचा कचरा टाकण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती नगरपंचायतीला केली आहे. 
- लक्ष्मण तनपुरे, 
उपअभियंता, पतन उपविभाग दापोली  

 
 

loading image