भंगाराच्या गाडीतून होतीये चक्क गुटख्याची वाहतूक ; व्यावसायिकांचा नवा फंडा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

प्लास्टिक भंगाराच्या गाडीतून गुजरातमधून गुटख्याची वाहतूक सुरू झाली आहे. 

चिपळूण : चिपळुणात प्लास्टिक भंगाराच्या गाडीतून गुटख्याची अनधिकृत वाहतूक सुरू झाली आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर चुकविण्यासाठी व्यावसायिकांनी हा नवीन फंडा शोधून काढला आहे. प्लास्टिक भंगाराच्या गाडीतून गुजरातमधून गुटख्याची वाहतूक सुरू 
झाली आहे. 

चिपळूण शहरात काही दिवसांपूर्वी २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली, तसेच अन्य दोघांवर गुटख्याची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यातील तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तर एकजण चिपळूण शहरातील आहे. गोवा, रत्नागिरी, चिपळूणमध्ये अनधिकृत गुटख्याचा साठा केला जात होता.

हेही वाचा -  २५ लाख तर मिळाले नाहीतच, पाच लाख मात्र गेले ; केबीसीच्‍या नावाखाली महिलेची फसवणूक

तेथील व्यावसायिक छोट्या व्यावसायिकांना गुटखा पुरवत असल्याची कबुली शिरसाट याने दिली. सद्यःस्थितीत कर्नाटकमधून येणारा गुटखा थांबला असून, आता गुजरातमार्गे गुटख्याची वाहतूक सुरू झाल्याची चर्चा आहे. गुजरातमध्ये प्लास्टिकवर प्रक्रिया करून विविध वस्तू तयार करण्याचे कारखाने आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आणला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात प्लास्टिकचा भंगार गोळा करून तो गुजरातला पाठवला जातो. भंगाराला जागा मोठी लागते; मात्र वाहतुकीचा खर्च परवडत नाही म्हणून काही व्यावसायिकांनी प्लास्टिकचे दाणे तयार करण्याचे कारखाने सुरू केले आहेत.

प्लास्टिकचे हे दाणे गोणीमध्ये भरून पाठवले जाते. त्यासाठी जागाही कमी लागते आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची वाहतूक करता येते. रत्नागिरी जिल्ह्यातून ट्रक आणि कन्टेनरमधून त्याची गुजरातला वाहतूक केली जाते. गुजरातमध्ये प्लास्टिकचा भंगार सोडल्यानंतर त्यात गुटखा भरून तो जिल्ह्यात आणला जात आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून समोर रिकाम्या गोण्याही ठेवल्या जात आहेत. 

हेही वाचा - तरुणांनो सावधान : काही  मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -

"मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या मालवाहू ट्रक, कंटेनरची तपासणी आम्ही सुरू केली आहे. कंटेनर उघडल्यानंतर त्यात समोर ठेवलेला माल दिसतो. त्याच्या खाली काय ठेवलेले असते, ते पाहता येत नाही. ते शोधण्यास भरपूर कालावधी लागतो. अशाप्रकारे तपासणी केल्यास वाहनांच्या रांगा लागतील. चिपळूण शहरातील नागरिकांनी २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यासाठी मदत केली. त्याप्रमाणेच इतर भागातील नागरिकांनी मदत करावी."

- गोविंद वारंग, पोलिस उपनिरीक्षक महामार्ग पोलिस

 

"चिपळूण शहर आणि उपनगरात भंगाराचे गोदाम आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवल्यास गुटख्यासह इतर घातक पदार्थांची तस्करी उघड होऊ शकते."

- प्रकाश आंब्रे, चिपळूण

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gutkha transport from the scrap yard in ratnagiri chiplun the new fanda of this type of profession people in ratnagiri