
सिंधुदुर्ग : कणकवलीत गटारीचे रुंदीकरण
कणकवली - महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे तीन वर्षांपासून पावसाळ्यात शहरातील रामेश्वर प्लाझा संकुलामध्ये पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान होत होते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. महामार्गाखालील या गटाराचे आजपासून रुंदीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे यंदापासून संकुलामध्ये पाणी जाण्याचा धोका राहणार नाही, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. महामार्ग चौपदरीकरणात प्रांत कार्यालयासमोरील नाल्याचे बांधकाम करताना महामार्ग ठेकेदाराने लगतच्या गटाराचा मार्ग अरुंद ठेवला होता. त्यामुळे प्रांत कार्यालयालगतच्या रामेश्वर प्लाझा संकुल आणि तेथील इतर घरांमध्ये अतिवृष्टी कालावधीत पाणी घुसत होते.
यात घरातील अन्नधान्य, कपडे व इतर साहित्याचे मोठे नुकसान होत होते. गेली दोन वर्षे महामार्ग विभागाकडून या नाल्याची दुरूस्ती करण्याची ग्वाही देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. त्यामुळे नगरपंचायत फंडातून गटार रूंदीकरणासाठी १२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून या गटार रूंदीकरणाचे काम आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.
स्थानिकांकडून समाधान व्यक्त
पावसाळ्यात रामेश्वर प्लाझा संकुलामध्ये पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान होत होते. मागील पावसाळ्यात येथील रहिवाशांना या समस्येचा मोठा सामना करावा लागला होता. गटार अरुंद असल्यामुळे प्रांत कार्यालयालगतचे संकुल आणि तेथील इतर घरांमध्ये अतिवृष्टीत पाणी घुसत होते. या समस्येती नगरपंचायतीने दखल घेऊन निधी दिला. अखेर काम सुरू झाल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Web Title: Gutter Widening In Kankavli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..