प्रेरणादायी ! दिव्यांग असूनही उषाने मिळवला उत्कृष्ठ तलाठीचा सन्मान 

अजय सावंत
Saturday, 22 August 2020

सावंतवाडी तालुक्‍यातील मडूरा येथील उषा महादेव परब व आताच्या उषा विश्‍वास कदम यांनी अपंगावर मात करून तलाठी क्षेत्रात केलेली वाटचाल निश्‍चितच समाजाला प्रेरणा देणारी आहे.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - अनेक संकटावर मात करीत महसूल विभागात सर्वसामान्यांना अतिशय चांगली सेवा देणाऱ्या नेरूर गावच्या तलाठी उषा महादेव परब यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा पातळीवरील पहिल्या पुरस्काराचे त्या मानकरी ठरल्या. दिव्यांग असूनही त्यांनी केलेले कार्य निश्‍चितच सर्वांनाच प्रेरणा देणारी बाब आहे. 

सावंतवाडी तालुक्‍यातील मडूरा येथील उषा महादेव परब व आताच्या उषा विश्‍वास कदम यांनी अपंगावर मात करून तलाठी क्षेत्रात केलेली वाटचाल निश्‍चितच समाजाला प्रेरणा देणारी आहे. 14 वर्षे तलाठी म्हणून काम करत असताना त्यांनी त्या-त्या गावांत महसूल अंतर्गत येणाऱ्या कामाबाबत सर्वांची केलेली कामे ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. म्हणूनच त्यांना जिल्ह्याचा पहिला उत्कृष्ट तलाठी पुरस्कार मिळाला. तो योग्यच म्हणावा लागेल. 

वयाच्या पाचव्या वर्षी अपंगत्व आलेल्या पूर्वाश्रमीच्या उषा परब यांनी अनेक समस्यांना तोंड देत, बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. यात त्यांना त्यांचे वडील महादेव परब व भावांचे मोठे सहकार्य मिळाले. जिद्द, चिकाटी, मेहनत व आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्यांनी तलाठी क्षेत्रात केलेले भरीव कार्य निश्‍चितच समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्या गेली चौदा वर्षे तलाठी क्षेत्रात कार्यरत आहेत. 

2006 पासून कुडाळ तालुक्‍यातील कविलकाटे गावातून त्यांनी तलाठी कामाचा प्रारंभ केला. त्यानंतर बाव तसेच मालवण तालुक्‍यामध्ये त्यांनी तलाठीपदाची धुरा सांभाळताना पदाचा वापर त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून केला. त्यांनी पुरवठा विभागातही चार वर्षे काम केले आहे. अपंग असताना त्यांची सेवाभावी वृत्ती ही निश्‍चितच विशेष कौतुकास्पद आहे. सध्या नेरूर देऊळवाडा येथे गेली तीन वर्षे त्या तलाठी पदाचा कार्यभार सांभाळताना सर्व थरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

महसूल विभागांतर्गत जी कामे आहेत ती परब यांच्या माध्यमातून निश्‍चितच सोडवले जातील, अशा प्रकारचे सूर शेतकरी, ग्रामस्थच नव्हे तर लोकप्रतिनिधी यांच्यातुनही ऐकू येत आहे. आपल्या तलाठी कार्यालयात काम करताना त्यांनी वेळेचे कधी भान ठेवले नाही. शासकीय वेळेपेक्षा गावातील गरजू लोकांना जलद कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विसरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 10 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच जिल्ह्यातून उत्कृष्ट तलाठी म्हणून एकच पुरस्कार दिला जातो. त्याचा पहिला मान हा उषा महादेव परब ऊर्फ सौ. उषा विश्‍वास कदम यांना मिळाला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. पूर्वी हा पुरस्कार तालुकानिहाय देण्यात येत होता. यावर्षीपासून जिल्हास्तर करण्यात आला आहे. 

"" या सर्वामागे माझे पती विश्‍वास कदम यांची सदैव साथ मिळाली. त्याशिवाय महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार यांचे नेहमीच मार्गदर्शन हे माझ्या या पुरस्कारासाठी मिळाले आहे. माझ्या या यशात आई, वडील, गुरू, माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मंडळ, अधिकारी, ग्रामस्थ आदी सर्वाचा सहभाग आहे. विशेष म्हणजे अलीकडेच कोरोना संकटात सर्वांसाठी देवदूत ठरलेले तत्कालीन तहसीलदार रवींद्र नाचणकर यांचे मला सातत्याने मार्गदर्शन मिळाले. या सर्वांमुळेच मी या पुरस्काराची मानकरी ठरले.'' 
- उषा महादेव परब  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicap Usha Parab Gets Honor Of Excellent Talathi