'खोटे बोला, पण रेटून बोला ही वृत्ती राणेंनी बंद करावी'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

शिवसेना आमदारांनी दिलेल्या निधीची माहिती न घेता आमदार नीतेश राणे यांनी अज्ञान जनतेसमोर प्रकट केले आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) : कोविड १९ उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम आमदार वैभव नाईक यांनी २५ लाखांचा निधी दिला आहे. हा निधी जिल्हा नियोजनमार्फत आरोग्य यंत्रणेकडे वर्ग केला आहे. शिवसेना आमदारांनी दिलेल्या निधीची माहिती न घेता आमदार नीतेश राणे यांनी अज्ञान जनतेसमोर प्रकट केले आहे. जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. खोटे बोला, पण रेटून बोला ही वृत्ती राणेंनी बंद करावी, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

हेही वाचा -  गरिबाकडून पैसे घेऊ नका, नाहीतर पैसे मोजायलाही हात शिल्लक राहणार नाहीत -

पत्रकात म्हटले आहे, की आमदार नाईक यांनी २०२०-२०२१ मध्ये आमदार स्थानिक विकास निधीतून दहा लाखांचा निधी जिल्हा आरोग्य विभागासाठी जिल्हा परिषदेकडे १७ जुलैला दिला आहे. आमदार राणे यांनी वैयक्तिक स्वार्थ जोपासून सर्वात शेवटी कोरोना संपत आल्यावर निधी देत आपलेच तुणतुणे वाजवत आहेत. आमदार नाईक यांनी निधी दिला तेव्हा ते मुंबईत बसून ट्विटरवर टिव्ह टिव्ह करत होते. कदाचित त्यामुळेच त्यांना निधीची माहिती नसावी. अशी टीकाही खोबरेकर यांनी केली आहे. 

सावंतवाडी मतदारसंघाचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी २०१९-२० आमदार स्थानिक विकास निधीमधून आरोग्य यंत्रणेसाठी एकूण ४८ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनी खासदार स्थानिक विकास निधी २०१९- २० अंतर्गत ३ लाखांचा निधी दिला आहे. असा एकूण ८६ लाखाचा निधी आमदार नाईक, आमदार केसरकर, खासदार राऊत यांनी आरोग्य यंत्रणेसाठी दिला 
आहे. 

जिल्हा वार्षिक योजनेतून कोविड उपाययोजनेसाठी २०१९-२० मध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयांसाठी ७ कोटी ७५ लाख ४५ हजार रुपये देण्यात आले. त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यासाठी ७५ लाख १९ हजार देण्यात आले आहेत व २०२०- २१ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७ कोटी ८३ लाख ७१ हजार रुपये देण्यात आले. याअंतर्गत १ कोटी २३ लाख रुपये आरटीपीसीआर लॅबसाठी, ७२ लाख रुपये, ऑक्‍सिजन प्लांटसाठी, १ कोटी ३६ लाख रुपये मधून व्हेंटिलेटर घेण्यात आले. तसेच इतरही निधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - चार गुंठ्यासाठी सव्वा कोटी हे लोकांच्या हितासाठीच -

अभ्यासपूर्ण टीका करा

कोकणचे स्वयंघोषीत भाग्यविधाते समजणारे खासदार नारायण राणे यांनी २०१९-२० व २०२०-२१ मध्ये आपल्या खासदार निधीतून एक नवा रुपया देखील जिल्ह्याला दिला नाही. जनतेची एवढी काळजी असती तर निधी का दिला नाही हे त्यांनी जाहीर करावे. राणेंनी अभ्यासपूर्वक टीका करावी, असा सल्लाही खोबरेकर यांनी दिला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hari khobrekar criticised on nitesh rane on the topic of corona fund in sindhudurg