esakal | मनमोहक ! इंदवटी परिसरातील हवलीचा कडा धबधबा
sakal

बोलून बातमी शोधा

Havali Kada Water Fall In Indvati Village Ratnagiri Marathi News

हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प आहे. भगते वाडी परिसरात या धरणाच्या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो. भातांच्या हिरव्यागार खेचरांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे

मनमोहक ! इंदवटी परिसरातील हवलीचा कडा धबधबा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लांजा ( रत्नागिरी ) - मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत -ठाणेश्वर व इंदवटी परिसर पर्यटनदृष्ट्‌या लक्षवेधी आहे. याच परिसरात हवलीचा कडा धबधबा कोसळतो. निओशी गाव सुरु होताच एका बाजूला हिरव्यादाट डोंगररांगा व संथ वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे विहंगम दृश्‍य आपल्याला आकर्षित करते.

हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प आहे. भगते वाडी परिसरात या धरणाच्या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो. भातांच्या हिरव्यागार खेचरांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे 

श्री देव लक्ष्मीकांत व ठाणेश्वर 
श्री देव लक्ष्मीकांत व श्री देव ठाणेश्वराचा परिसर मन प्रसन्न करतो. गर्भगृह व छटेखानी सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. बाईतवाडीतील श्रीदेव लक्ष्मीकांत इंदवटी, गोळवशी, खावडी व अर्धा निओशी या साडे तीन गावांचा मानकरी आहे. लक्ष्मीकांत हे विष्णूचे उपनाम. हजार ते बाराशे वर्षापूर्वीची शिलाहार राजवटीतील हे देवस्थान असावे असा अंदाज आहे. काळ्या दगडातील शंख, चक्र, गदा, पद्मधारी घडीव श्री विष्णूची (लक्ष्मीकांत) मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजुला जय -विजय हे द्वारपाल असून मूर्तीच्या खालच्या बाजूला गरुड हात जोडून उभा आहे. तसेच त्याच काळातील गणपती शिल्प सुद्धा अजून सुस्थितीत आहे. श्री देव लक्ष्मीकांत या नावाने हे देवस्थान प्रसिद्ध आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचा कुंडस्वरूप झरा आहे. मंदिरामागील छोटेखानी धबधबा आकर्षित करतो. याचा गाज वातावरणात वेगळाच रंग भरतो. 

हवलीचा कडा धबधबा 
देव श्री लक्ष्मीकांत मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा हवलीचा कडा या नावाने परिचित आहे. बाईत वाडितील स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीनेच हवलीचा कडा गाठावा. धबधब्याकडे जाताना भोवताली असलेली गर्द जंगलराई, भाताची हिरवीगार खाचरे, नारळी पोफळीच्या बागा लक्ष वेधून घेतात. डोंगर उतारावरील ही भाताची हिरवीगार खाचरे केरळमधील चहाच्या मळ्यांची आठवण करुन देतात. यातून मार्ग काढत पोहचल्यावर पांढराशूभ्र फेसाळणारा धबधबा पाहिला की, अंगातला क्षीण क्षणार्धात निघून जातो. हवलीचा कडा धबधबा कोसळताना होणारा नाद एकीकडे धडकी भरवतो तर दुसरीकडे खडकावर आपटुन उडणाऱ्या तुषारातुन तो तुम्हाला परमोच्च सुखाच्या आनंदाने न्हाऊ घालतो. 

कसे जाल 
लांजा - कोंडये - निओशी -इंदवटी 
लांजा -कुवे- वनगुळे -इंदवटी 
लांजा - कोंडये- गोळवशी - इंदवटी