५१ ग्रा. पं. निवडणुकांचे घुमू लागलेत ढोल : इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात

राजेंद्र बाईत
Wednesday, 28 October 2020

तालुक्‍यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचे ढोल आता गावोगावी घुमू लागले आहेत.

राजापूर :  मे ते जुलैदरम्यान मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने प्रभागरचना निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातून ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या तालुक्‍यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचे ढोल आता गावोगावी घुमू लागले आहेत.

तालुक्‍यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या मुदती मे ते जुलै दरम्यान संपल्या असून त्यांचा कारभार सध्या प्रशासकांद्वारे हाकला जात आहे. यामध्ये शिळ, धोपेश्‍वर, गोवळ, उन्हाळे, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, कोदवली, ओणी, कोडींवळे, मंदरूळ, चुनाकोळवण, पन्हळेतर्फे सौंदळ, तळगांव, मोसम, पांगरे बु. ससाळे, दोनिवडे, कारवली, हरळ, रायपाटण, करक, पांगरीखुर्द, येरडव, कार्जिडा, कोळंब, मिळंद, जवळेथर, हातदे, मोरोशी, सौंदळ, ताम्हाणे, तुळसवडे, फुपेरे, परटवली, ओशिवळे, आडवली, आंबोळगड, सोलगांव, शिवणेखुर्द, वाडापेठ, कशेळी, कोंडसर बु., कुंभवडे, पडवे, महाळुंगे, तारळ, वाल्ये, अणसुरे, कुवेशी, दळे, निवेली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

कोरोनातील लॉकडाऊमुळे मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्याही हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. यामध्ये या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महसूल विभागाकडून प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर दाखल झालेल्या हरकतींवर विचार होवून त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.  मे ते जुलै दरम्यान मुदगत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या आगामी डिसेंबर किंवा नव्या वर्षामध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून पक्षांतर्गंत ‘गॉडफादर’च्या माध्यमातून वरिष्ठांकडे उमेदवारीचे घोडे दामटवायला सुरूवातही केली आहे. 

हेही वाचा- मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू  ; आठवड्यातून या तीन दिवशी सेवा राहणार सूरू -

तालुक्‍यातील संभाव्य ५१ ग्रामपंचायतीत थेट सरपंच होण्याची मनिषा बाळगलेल्या इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी पेरले जाणार आहे. लोकांमधून थेट सरपंच निवड न झाल्यास निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे महत्व कमालीचे वाढणार आहे.

 

दृष्टिक्षेपात राजापूर
  एकूण ग्रामपंचायती    १०१
  निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती........................५१
  प्रभाग    १५६
  जागा    ३९९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he drums of the five yearly elections of 51 gram panchayats are now moving from village to village