नोकरी सोडून कातळावर पिकवली शेती ; पडीक जमिनीवर फुलविले नंदनवन 

सुधीर विश्‍वासराव  
Wednesday, 21 October 2020

शेतीतून हमखास उत्पन्न मिळते याची खात्री पटल्यामुळे कालांतराने आठ तासाची नोकरी सोडून शेतातच काबाडकष्ट करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला.

पावस - नोकरी करून पैसे कमावण्यापेक्षा आपल्याच पडीक जागेमध्ये शेती करून हक्काचे उत्पन्न घ्यावे, या उद्देशाने पाच वर्षापासून भाजी व्यवसाय सुरू केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांच्या नोकरीधंद्यावर परिणाम झाला पण या अडचणीच्या काळात कातळावर माती टाकून त्यावर केलेल्या भाजीपाल्यातून उत्पन्न मिळत आहे. ही भाजी आता रत्नागिरी शहराऐवजी रत्नागिरी-पावस या सागरी मार्गावरच  विक्री करून उन्नतीचा मार्ग सापडला, असे गोळप कातळवाडीतील अनिल सखाराम पवार या शेतकर्‍याने सांगितले. 

पवार यांनी कातळावरच पडवळ, मुळा, भेंडी, वाल-दोडका, काकडी, मोहरी, मेथी, पालक, कोथिंबीर, अननस आदींची लागवड केली आहे. पावस बाजारात मागणी वाढल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी पुढे नोकरी सोडून शेतीची कास धरली. वर्षभरात भातशेती आणि भाजीपाला लागवड करून त्यातून उत्पादन मिळवण्यास सुरवात केली. यंदा मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाला. सर्व व्यवहार ठप्प झाले. वाहतुकीची सोय नसल्यामुळे व सर्व दुकाने व व्यवसाय बंद असल्याने पावसला भाजीपाला विक्रीकरिता जाणे कठीण झाले. भाजीपाला विक्रीला परवानगी असल्यामुळे शेतातील भाजीपाला पावस मार्गावर विक्री सुरू केली. गेल्या सहा महिन्यात याला चांगलेच यश मिळाले.

शेतीतून हमखास उत्पन्न मिळते याची खात्री पटल्यामुळे कालांतराने आठ तासाची नोकरी सोडून शेतातच काबाडकष्ट करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. नोकरी सोडल्यानंतर मात्र भाजी लागवडीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहू लागलो. त्याला पत्नीने मदत केली. दिवसभर शेतातच काम करू लागल्याने उत्पन्न वाढू लागले. नोकरी न करता स्वतःच्या जागेत भातशेतीबरोबर भाजीपाला लागवड करून त्यातून उत्पादन मिळवण्याचा चंग पवार यांनी बांधला आणि तो यशस्वी करून दाखवला. पवार म्हणाले, कोरोनामुळे नोकरीऐवजी शेती व्यवसायामुळेच आम्ही तरलो. भाजीपाल्याच्या लागवडीत शेणखत, युरिया खताचा वापर करतो. पाण्याची योग्य मात्रा देऊन स्वतः मेहनत केल्यामुळे मजुरीचा प्रश्‍नच आला नाही. वर्षभर दुसर्‍या गावात जाऊन विक्री करण्यापेक्षा स्वतःच्या गावातच ताजी भाजी विकतो. शेतीसाठी कृषी सहाय्यक धनंजय पोळ यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे पवार यांनी सांगितले.

हे पण वाचाहृदयद्रावक : वर्षभरापूर्वीच मुलीला अन् आता एकुलत्या एक मुलाला गमावलेल्या आई वडिलांचा आक्रोश  

“नोकरी करून दुसर्‍याकडे राबण्यापेक्षा महिन्यापोटी भरलेल्या दिवसाचे पैसे मिळत होते. नोकरीपेक्षा जास्त स्वतःच्या जागेत लागवड करून हक्काचे उत्पन्न मिळत आहे. या व्यवसायातून खर्च वजा जाता महिन्याला आठ ते दहा हजार रुपये सहज मिळतात. आज मी आत्मनिर्भर बनलो आहे.”

- अनिल पवार.

हे पण वाचाकोल्हापूराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा :  सेवा रुग्णालयाला ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He left his job and started farming