
सन्मान आरोग्यदूतांच्या सेवेचा
सावंतवाडी: ‘‘कोणतेही राष्ट्र तेव्हाच पुढे जाते, जेव्हा ते त्यांच्यातील हीरोंना प्रोत्साहित करतात. नेमक्या अशाच सर्वसामान्यांच्या कार्याचा सन्मान ‘सकाळ’च्या वतीने होत आहे’’, असे गौरवोद्गार नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी आज येथे व्यक्त केले. ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र २०२२’ या विशेष गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, सरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते.
रत्नागिरी, चिपळूण, लांजा, तळेरे, कणकवली, सांगवे-कनेडीतील ‘हेल्थ आणि वेलनेस’ क्षेत्रातील मान्यवरांना आज कोल्हापुरातील हॉटेल ‘सयाजी’ येथे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागात रुग्णांची सेवा करण्यासाठी परदेशात जाणेही नाकारणाऱ्यांपासून ते कोविडमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या देवदूतांचा येथे सन्मान करण्यात आला. शानदार सोहळ्यात डॉक्टरांचा विशेष सत्कारही करण्यात आला. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात आणि स्वतः डॉक्टर असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सर्वांना गौरविण्यात आले.
श्री. थोरात म्हणाले, ‘‘रणांगणावरच नव्हे, तर सर्वसामान्यांतही योद्धे आहेत. त्यांच्यातही शौर्य आहे. यांना एकत्रित करण्याचे काम ‘सकाळ’ने केले, हे कौतुकास्पद आहे. सर्वसामान्यांतील शौर्याचा सन्मान आज होत आहे. तुम्ही एकत्रित आले पाहिजे. परोक्ष वा अपरोक्ष पद्धतीने या, पण तुम्ही एकत्रित आले पाहिजे. समाजात दोन्ही बाजूंनी संवाद घडायला हवे. नेमके हेच काम ‘सकाळ’ करीत आहे. ‘करेज’ आणि ‘ब्रेव्ह’ हे दोन इंग्रजीतील शब्द आहेत. यातील ‘ब्रेव्ह’ हा शक्यतो रणांगणावर वापरला जातो; पण ‘करेज’ हा एक वेगळा शब्द आहे. ‘करेज’ तेव्हा दिसते की परिणाम माहिती असतानाही तुम्ही ते कार्य करता.
ब्रिटिश सरकार विरोधात बंड केले, तर तुरुंगात जाणार हे माहिती असतानाही ते करणे, कोविड होऊ शकतो हे माहिती असतानाही कोविड रुग्णावर उपचार करणे, मी चांगले पैसे मिळवू शकतो, हे माहिती असतानाही ग्रामीण भागात जाऊन लोकांची सेवा करणे, याला शौर्य म्हणतात. सर्वजण डॉ. बाबा आमटेंसारखे होणार नाहीत; पण त्यांच्यासारखे काम करणारे अनेकजण आहेत. असे सर्व एकत्रित आले पाहिजेत. त्यांना एकत्र आणण्याचे काम ‘सकाळ’ने आजच्या व्यासपीठावर केले आहे. ज्याकडे व्हिजन, डेडिकेशन आणि हार्ट आहे, त्यांच्याकडून तुम्हाला एकत्र करण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे.’’
डॉक्टरांकडून अथक सेवा कादंबरी बलकवडे
डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘‘डॉक्टर हा डॉक्टर असतो. तो शासकीय सेवेतील असो किंवा खासगी सेवेतील. प्रत्येक डॉक्टर हा रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. कोल्हापुरात कोविड काळात शासकीय आणि खासगी डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून रुग्णसेवा करून दाखविली. आता डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल माध्यमांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीतही डॉक्टरांनी त्यांचे एथिक्स पाळून सेवा करायला हवी.’’
सीताराम जाधव यांनी सादर झालेल्या मराठी गीतांनी गौरव सोहळ्याची शोभा आणखी वाढविली. निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले.
गौरव कर्तृत्वाचा...
डॉ. विजय रिळकर, डॉ. शेखर पालकर व सहकारी अपरान्त हॉस्पिटल (चिपळूण)
वसंत महादेव देसाई- श्री स्वामी समर्थ ऑप्टिकल्स (लांजा) यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव डॉ. सुहास देसाई व नंदकुमार लिंगायत
डॉ. संतोष ढगे- ढगे हेल्थ केअर (चिपळूण)
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या वतीने धनंजय पराडकर, नैनेश लकेश्री
डॉ. विक्रांत कवितके- दंतशल्य चिकित्सक (रत्नागिरी)
डॉ. ऋचा कुळकर्णी- चैतन्य नर्सिंग होम (तळेरे-सिंधुदुर्ग)
डॉ. माधव सोमण आणि डॉ. राधा मोरे- माधवबाग कार्डियाक आयुर्वेद क्लिनिक (चिपळूण)
वैद्य योगेश मुकादम- आयुर्वेद पंचकर्म उपचार केंद्र (टीआरपी रत्नागिरी)
डॉ. मतीन अलिमियां परकार- परकार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर प्रा. लि. (रत्नागिरी)
डॉ. तोरल नीलेश शिंदे- रत्नागिरी टेस्टट्यूब बेबी ॲण्ड रिसर्च सेंटर (रत्नागिरी)
डॉ. प्रतीक सुजित झिमण- शिवश्री हॉस्पिटल (कारवांचीवाडी, रत्नागिरी)
डॉ. यतीन जाधव- स्प्रिंग्ज स्किन कॉस्मेटॉलॉजी लेझर क्लिनिक (चिपळूण)
डॉ. प्रवीण यशवंत सुतार- सदिच्छा हॉस्पिटल आणि बाल रुग्णालय (लांजा-रत्नागिरी) यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
डॉ. बाळकृष्ण महाडेश्वर, हॉस्पिटल (कणकवली)
डॉ. साईनाथ नागवेकर - नागवेकर हॉस्पिटल (सांगवे कनेडी-सिंधुदुर्ग) यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे; परंतु ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.
Web Title: Health Ambassadors Service Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..