गणेशोत्सवासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क, काय नियोजन आहे? वाचा...

नंदकुमार आयरे
शनिवार, 11 जुलै 2020

यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेरील चाकरमानी येण्याची दाट शक्‍यता लक्षात घेऊन त्यांच्याकरवी जिल्ह्यात साथीचे रोग पसरू नयेत याबाबत खबरदारी घेण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गनगरी -  गणेशोत्सव कालावधीत उद्भवणारे साथरोग आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख चार चेक पोस्टवर आरोग्य पथके तैनात करून जिल्हाबाहेरून येणाऱ्यांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे त्यांनी आरोग्य समिती सभेत दिली 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, सदस्य प्रितेश राहुल, हरी खोबरेकर ,लॉरेन्स मानेकर, शर्वाणी गावकर, नूतन आईर आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.

यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेरील चाकरमानी येण्याची दाट शक्‍यता लक्षात घेऊन त्यांच्याकरवी जिल्ह्यात साथीचे रोग पसरू नयेत याबाबत खबरदारी घेण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत कोरोना, डेंगी, मलेरिया, लेप्टो यासारख्या साथ रोगाचा फैलाव होऊ नये, म्हणून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी खारेपाटण, करूळ ,फोंडाघाट, आंबोली या प्रमुख चार चेकपोस्टवर आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत.

त्याठिकाणी आवश्‍यक मेडिसिनसह डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात येणार आहेत. जेणेकरून तपासणीदरम्यान आढळलेल्या संशयित रुग्णांची माहिती तत्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी खलीपे यांनी सभेत दिली. 
राज्यात कोरोनाचे संकट असताना आपला जीव धोक्‍यात घालून ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात शासनाने 25 टक्के कपात केली याबाबत सदस्य प्रितेश राऊळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधत तीव्र नाराजी व्यक्त केली.

जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने वाढीव पगार जाहीर करावा, अशा मागणीचा ठराव सभेत घेण्यात आला. साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 222 गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. जिल्हा बाहेरून आलेल्या 340 गरोदर मातांची विशेष नोंद करून प्रसूती वेळी अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health department prepares for Ganeshotsav konkan sindhudurg