
एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वाढवून पक्षाला बळ द्या
दाभोळ (रत्नागिरी) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या राजकीय पक्षांचे सरकार असले तरी आपण एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वाढवून पक्षाला बळ द्या, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दापोली येथे आयोजित केलेल्या सत्कारानंतर व्यक्त केले.
राज्याचे आरोग्यमंत्री टोपे हे तीन दिवसांच्या दापोली तालुक्याच्या खासगी दौऱ्यावर आले असता, दापोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कारानंतर ते म्हणाले, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व हे चमत्कार करणारे आहे. हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. सर्वधर्म समभाव मानणारी ही राष्ट्रवादी पार्टी आहे. येथे जातीयवादाला थारा नाही, असे सांगत विकासकामे करत असताना गटबाजी करू नका. आपल्या भागाचा विकास करून घ्या, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा - पत्नी कागदपत्रे देत नसल्यामुळे जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने केले वार -
दापोली मतदार संघामध्ये माजी आमदार संजय कदम यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांची नाळ सर्वसामान्य माणसांशी जोडलेली पाहायला मिळत आहे. सर्वांमध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांनी संजय कदमांचे कौतुक केले. माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजीब रुमाणे, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, पंचायत समितीच्या उपसभापती ममता शिंदे, कर्देचे सरपंच सचिन तोडणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य खात्याचे सर्व प्रश्न मार्गी लावणार
दापोली मतदारसंघातील आरोग्य खात्याचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असून यापुढे रेशनकार्ड कोणत्याही रंगाचे असूदे, प्रसूती ही मोफतच होण्यासाठी दापोली शहरातील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलला आपण रीतसर परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टोपे यांचे गौरवोद्गार...
- दापोली मतदारसंघात पर्यायाने कोकणात यायला आवडेल
- येथील कोकणी माणसावर चांगले संस्कार आहेत
- स्वच्छतेमध्ये कोकण महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर
- कोकणात पर्यटनाला बळकटी देण्याची फार मोठी गरज
- याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन
संपादन - स्नेहल कदम