esakal | सात स्पर्धकांवर पडली भारी, गृहिणीने घेतली सुवर्णभरारी
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

सात स्पर्धकांवर पडली भारी, गृहिणीने घेतली सुवर्णभरारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत येथील स्नेहा महेश सकपाळ यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची हरियाणा येथे २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बॉक्सिंग स्पर्धेत असे धवल यश मिळवणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला आहेत. कुटुंबाचा गाडा हाकत कामथेतील या गृहिणीने मिळवलेले सुवर्णपदक अनेकांना प्रेरणादायी आहे.

सकपाळ यांनी २००५ मध्ये बॉक्सिंग खेळण्यास महाविद्यालयीन जीवनापासून सुरवात केली. २०१२ मध्ये त्यांनी राज्यपातळीवर सुवर्णपदक मिळवले होते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवले होते. २०१२ नंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे काही महिने त्यांना बॉक्सिंगचा सराव करता आला नाही. २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला. नंतर मुलगी झाली. त्यातही त्यांनी खेळाची आवड जोपासली.

सरावाकरिता कामात थोडी सवलत

स्नेहा सकपाळ या २०१२ पासून महावितरण चिपळूण येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना एक खेळाडू म्हणून फारशी सवलत मिळत नव्हती; मात्र चंद्रपूर येथे सुवर्णपदक मिळवल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव करण्याकरिता कामात थोडी सवलत दिली आहे

कुटुंबाने सहज स्वीकारली

स्नेहा २००५ मध्ये मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुले बॉक्सिंग खेळताना दिसत होती. तिथे बॉक्सिंगकडे त्या वळल्या. पुढे या खेळाची गोडी लागली. त्यांचे पती महेश सकपाळ हे बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे कुटुंबाकडून ठोसा देणारी मुलगी सहज स्वीकारली गेली. त्यांच्या ७५ वर्षाच्या सासुबाई चिमुकलीचा दिवसभर सांभाळ करतात. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदके मिळवण्यासाठी कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा मिळतो.

अंतिम फेरीसाठी सात स्पर्धक

गेल्या तीन-चार वर्षांत त्यांनी बॉक्सिंगचा चांगला सराव केला. त्यामुळेच नुकत्याच चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ६६ ते ७० किलो वजनी गटात अंतिम फेरीसाठी सात स्पर्धक सहभागी होते. त्यांना पराजित करत सकपाळ यांनी सुवर्णपदक पटकावले.

हेही वाचा: कोल्हापूर - आरवच्या हत्येचा उलगडा; बापानेच केलं कृत्य

महावितरणमध्ये नोकरी; पहाटे उठून सराव

स्नेहा महावितरणमध्ये नोकरी करतात. पहाटे साडेचारला उठून त्यांचा बॉक्सिंगचा सराव सुरू होतो. दिवसभर नोकरी आणि त्यानंतर सायंकाळी घरातील कामे झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी त्या कटाक्षाने दररोज ४ तास सराव करतात. स्नेहा यांना प्रशिक्षक वैभव वनकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

एक नजर

  1. २००५ मध्ये बॉक्सिंग खेळण्यास सुरवात

  2. २०१२ मध्ये मिळवले राज्यपातळीवर सुवर्णपदक

  3. राष्ट्रीय स्पर्धेत मिळवले होते ब्राँझ पदक

  4. २०१५ मध्ये त्यांचा विवाह; एक अपत्य

  5. तीन-चार वर्षात केला बॉक्सिंगचा चांगला सराव

हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. बॉक्सिंगमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. या खेळात मुलींना खेळातून करिअर करण्यासाठी चांगली संधी आहे.

- स्नेहा सकपाळ

loading image
go to top