अवकाळी पावसामुळे नगदी पिके धोक्यात

निलेश मोरजकर
Sunday, 21 February 2021

बांदा, मडुरा दशक्रोशीला काल (ता.19) सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानकपणे झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा व बांदा दशक्रोशीत काल (ता.19) दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसात नगदी पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची बसलेली झळ अजूनही कायम असताना अवकाळी पावसाचे दुहेरी संकट ओढावल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. 

बांदा, मडुरा दशक्रोशीला काल (ता.19) सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानकपणे झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. अवकाळी पावसाने आंबा, काजूचे उत्पन्न घटणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंता पसरली आहे. मिरची, चवळी ही नगदी पिकेही धोक्‍यात आली आहेत. ऐन काजू हंगामातच गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

शेर्ले नदी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर चवळी, नाचणी, भुईमुग, मिरची, मका, कुळीथ आदी पिकांची लागवड आहे. मडुरा दशक्रोशीत गव्यांचा हैदोस असताना शेतकऱ्यांनी नगदी पिकाचे उत्पन्न घेऊन धाडस दाखविले होते. पिकांचे संरक्षण केले जात असताना काल कोसळलेल्या अवकाळीने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. 
अतिवृष्टीत शेतकऱ्यांना नुकसानीची बसलेली झळ भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या दमाने शेतकरी उभा झाला होता. काढणीयोग्य आलेल्या आंबा व काजू पिकांवर काळे डाग पडल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेत दर विक्रीवर होणार आहे. कमी दरात काजू, आंबा विकला गेल्यास केलेला खर्चही हाती मिळणार नसल्याची चिंता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. 

"निदान व्याज तरी माफ करा' 
आंबा व काजू बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात सहकाराच्या माध्यमातून कर्जाची उचल केलेली आहे; परंतु पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट होणार असल्यामुळे कर्ज कसे फेडणार? असा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे कर्जमाफी जरी देता आली नसली तरी सरकारने निदान व्याजमाफी तरी करावी, अशी मागणी आंबा, काजू बागायतदारांमधून होत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain banda konkan sindhudurg