पूरस्थितीमुळे अख्खा तालुकाच `ब्लाॅक`; जनजीवन विस्कळीत, वाचा सविस्तर...

प्रभाकर धुरी
Thursday, 6 August 2020

तालुक्‍यात गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी नदीला पूर आला. तिलारीचे पाणी पात्राबाहेरून वाहत होते. अनेकांच्या शेतात आणि घरातही पाणी घुसले होते.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - मुसळधार पावसामुळे उद्‌भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अख्खा दोडामार्ग तालुका "ब्लॉक' झाला आहे. बहुतेक सगळे पूल पाण्याखाली गेल्याने सर्व रस्ते बंद झाले. सगळे लोक आपापल्या घरात अडकले आणि अख्खा तालुका थांबला. तालुक्‍यातील जनजीवन पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झाले होते. या पुराने गतवर्षीच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या होत्या. 

तालुक्‍यात गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी नदीला पूर आला. तिलारीचे पाणी पात्राबाहेरून वाहत होते. अनेकांच्या शेतात आणि घरातही पाणी घुसले होते. पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरांना वेढा घातला होता. कोनाळकट्टा, वायंगणतड, साटेली-भेडशीचा खालचा बाजार, मणेरी येथे अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. मणेरी येथील खालचा बाजार येथेही पुराचे पाणी घुसले.

वाचा - रत्नागिरी आणखी वीस जणांना कोरोनाची बाधा

तेथील महापुरुष मंदिराला तर बडमेवाडी येथील गोपीनाथ मंदिराला पाणी लागले होते. पावसाचा जोर रात्रीपासून मोठा होता. त्यात वादळी वारेही वाहत होते. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाण्याने उच्चांकी पातळी गाठली. दोडामार्ग तिलारी मार्गावरील साटेली-भेडशी येथील दामोदर मंदिराजवळचा कॉजवे, त्याच्या बाजूचा पर्यायी पूल पाण्याखाली गेले होते.

दामोदर मंदिरातही पाणी शिरले होते. साटेली आवाडे, वायंगणतड, घोटगेवाडी, वानोशी, घोटगे परमे येथील पूल पाण्याखाली गेले होते. उसप मार्गावरील भंडारपूल, झरेबांबर, उसप येथील पुलासह आयी, माटणे येथील पूल पाण्याखाली गेले होते. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ठिकठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या पडल्या. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून पडल्या होत्या. गेले तीन दिवस तालुक्‍यात वीज आणि नेटवर्क गायब आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. 

हेही वाचा - सावंतवाडी : असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली; मार्ग वाहतुकीस बंद

येथील तिलारी मार्ग बंद झाल्याने पोलिस, तहसीलदार आणि सर्वसामान्य लोकांनी उसप तिठा ते कोनाळकट्टा येथे येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तिलारी कालवा रस्त्याचा वापर केला. पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. वायंगणतड येथील गतवर्षीची पूरपरिस्थिती लक्षात घेवून पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना लाइफ जॅकेट दिली. मणेरीकडेही विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. तेथेही गतवर्षी अनेक कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. तिलारी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने आजूबाजूच्या केळीच्या बागांमध्ये पाणी घुसले. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे केळी मुळापासून उन्मळून पडल्या. 

आधीच कोरोनामुळे सर्वजण मेटाकुटीला आले आहेत. त्यात पुन्हा शेती बागायतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गतवर्षी नुकसान झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि त्यात आता पुन्हा तेच संकट आले आहे. त्यामुळे आता तरी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्याची गरज आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गमधील  या तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांसह गोठ्यांचे नुकसान...

"तलारीतून पाणी सोडलेले नाही' 
तिलारी धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडलेले नाही. निर्माण झालेली पूरपरिस्थिती ही मुसळधार पावसामुळे झाली आहे, अशी माहिती तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अभियंता श्री. आसगेकर यांनी दिली. तालुक्‍यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. साधारणपणे आज सकाळी एका तासात 70 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. त्याचमुळे तालुक्‍यात पूरपरिस्थिती निर्माण झाली; मात्र तिलारी धरणाचे अतिरिक्त पाणी यावेळी सोडले नसल्याचे त्यांनी सांगितले. पातळीत वाढ झाल्यास अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडावे लागेल. त्यामुळे सतर्कता बाळगावी, असे आवाहनही आसगेकर यांनी केले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain dodamarg taluka konkan sindhudurg