मुसळधारेमुळे दाणादाण; ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचले मुक्या जनावरांचे प्राण

निलेश मोरजकर
Thursday, 6 August 2020

आज पहाटेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची भितीने गाळणच उडाली. मांगराला लागूनच असलेल्या गोठ्यात जनावरे अडकली होती

बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा पंचक्रोशीत मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने पाडलोस-केणीवाडा येथील सूर्यकांत नाईक व प्रशांत नाईक यांचा मांगर जमिनदोस्त झाला. गेल्या मेमध्ये संपूर्ण मांगराचे दीड लाखांचे नुकसान झाले. तसेच मांगराला लागूनच असलेल्या गोठ्यातील सात जनावरे सुदैवाने वाचली तर एक जखमी झाले. 

आज पहाटेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची भितीने गाळणच उडाली. मांगराला लागूनच असलेल्या गोठ्यात जनावरे अडकली होती; मात्र ग्रामस्थांनी जनावरांचे प्राण वाचवले. पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, ग्रामस्थ सप्रेम परब, महादेव नाईक, सिद्धेश कोरगावकर, वामन केणी, राजन नाईक, समीर नाईक, श्रीधर परब, गणपत नाईक, परशुराम नाईक, महेश नाईक, लवु कुबल, मदन कुबल, भुषण केणी, प्रशांत नाईक, सूर्यकांत नाईक, गोकुळदास परब, एकनाथ नाईक, गंगाराम नाईक आदींनी मदतकार्य केले. 

वाचा - सिंधुदुर्गमधील  या तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांसह गोठ्यांचे नुकसान...

मडुरा माऊली मंदिर पूल पाण्याखाली गेल्याने पाच ते सहा तास वाहतूक खोळंबली होती. सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी वाहनचालक करत आहेत. कोंडुरा-दांडेली-सावंतवाडी मुख्य मार्गावरील दांडेली येथील पूल पाण्याखाली गेले. नदी काठच्या बागायतीत पाणी घुसल्याने पुरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली होती; परंतु पावसाचा जोर कमी होत गेल्याने पाण्याची पातळीही कमी कमी होत गेली. पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, पोलिसपाटील रश्‍मी माधव, मडुरा कोतवाल विष्णु वेंगुर्लेकर यांनी नुकसानग्रस्त मांगराची पाहणी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain impact madura konkan sindhudurg