रत्‍नागिरीत वादळी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने धुमाकूळ घातल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.

रत्‍नागिरीत वादळी पाऊस

रत्नागिरी - हवामान विभागाच्या अंदाजानुसार लांजा, साखरपा, देवरुख, संगमेश्‍वर, चिपळूणसह रत्नागिरी तालुक्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. संगमेश्‍वरला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, गाराही पडल्या. चिपळुण तालुक्यात सायंकाळी विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह व्यापाऱ्‍यांची तारांबळ उडाली. विजांच्या गडगटासह अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विद्युत खांबावर झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. गुहागर-विजापूर मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्याचा वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. या पावसाचा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे.

जिल्ह्यात प्रचंड उष्मा जाणवत आहे. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. भांबेड येथे गाराही पडल्या. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. चिपळूण, संगमेश्‍वर परिसरात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याप्रमाणे साखरपा परिसरात दुपारी विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहू लागले. मोसमी पावसाप्रमाणे जोरदार सरी कोसळू लागल्या. रस्त्यावर जिकडेतिकडे पाणीच पाणी साचलेले होते. वेगवान वाऱ्यामुळे देवरूख येथील मातृमंदिरासमोरील झाड कोसळले. त्यामुळे शिवाजी चौक ते ओझरेकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. एक तासाहून अधिक काळ विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. संगमेश्‍वर तालुक्यातील काही भागातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. संगमेश्‍वर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काहींनी गारा वेचण्याचा आनंदही घेतला. रत्नागिरी तालुक्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. पालीसह खाडीकिनारी भागात हलका पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर पुढील चार दिवस राहण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास ऐन हंगामात आंबा, काजू पिकांवर पावसाचा परिणाम होणार आहे. बुरशीसह फळमाशीच्या प्रादुर्भावाला आंबा बागायतदारांना सामोरे जावे लागेल. आधीच हापूसचे दर कमी होऊ लागल्याने बागायतदार चिंताग्रस्त झालेला असतानाच मुसळधार पावसाने त्यात भर पाडली आहे.

चिपळुणात वादळी पावसाने हाहाकार

चिपळूण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या तुफान वादळी पावसाने हाहाकार उडवला. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. विद्युत खांबावर झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Web Title: Heavy Rain In Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top