३६ तास वीज पुरवठा खंडित, ६० गावांत परिस्थिती बिकट, जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain kharepatan and vijaydurg area konkan sindhudurg

खारेपाटण शहरात काल (ता.4) सायंकाळपासूनच पूरस्थिती होती. तर मध्यरात्री 1 वाजल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत येण्यास सुरवात झाली.

३६ तास वीज पुरवठा खंडित, ६० गावांत परिस्थिती बिकट, जाणून घ्या सविस्तर

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने खारेपाटण शहर आणि विजयदुर्ग खाडीकाठच्या 50 ते 60 गावांत दाणादाण उडाली. खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. येथील वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठा 36 तास खंडित झाला होता. पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पूरस्थिती कायम राहिली आहे. 

खारेपाटण शहरात काल (ता.4) सायंकाळपासूनच पूरस्थिती होती. तर मध्यरात्री 1 वाजल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत येण्यास सुरवात झाली. त्यानंतर बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांची माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ सुरू होती. सर्वच व्यापाऱ्यांनी रात्र जागून काढली. त्यानंतर आज सायंकाळपर्यंत बाजारपेठेत पुराचे पाणी जैसे थे होते. यात खारेपाटण मच्छीमार्केट, दरवाजापेठ, बसस्थानक, बंदरगाव परिसर, कोंडवाडी, चिंचवली परिसर पाण्याखाली गेला होता. 

वाचा - सावंतवाडीला पावसाने झोडपले; ग्रामीण भागालाही वादळी वाऱ्याचा तडाखा

खारेपाटण शहरात येण्यासाठी हायस्कूल आणि कपिलेश्‍वर मंदिर या दोन ठिकाणाहून रस्ते आहेत. आज या दोन्ही रस्त्यांवर दहा फुटापेक्षा अधिक पाणी असल्याने खारेपाटणचा संपर्क तुटला. तसेच जैनवाडी देखील पाण्याने वेढली गेली असल्याने त्या वाडीतील नागरिकांनी तेथील जैन मंदिराचा आसरा घेतला आहे. घोडेपाथर आणि बंदरगाव परिसरातील बाबा मुकादम, सलीम मुकादम यांच्यासह अन्य तीन घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. तर बाजारपेठेतील दिगंबर खेतल, सत्यवान तळगावकर, सुभाष चव्हाण, श्री.तांबट यांच्या दुकानांत रात्री एकच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. 

वीज पुरवठा ठप्प 
खारेपाटण स्मशानभूमी परिसरातील वेगवान पाण्याच्या प्रवाहाने तेथील वडाचे झाड वीज तारांवर कोसळले होते. त्यामुळे खारेपाटण आणि परिसराचा वीज पुरवठा काल दुपारी बंद झाला होता. त्यानंतर सरपंच रमाकांत राऊत, महावितरण अभियंता श्री.मर्ढेकर यांच्यासह कांता झगडे, विजय डोर्ले, सागर खांडेकर, महेंद्र गुरव आदींनी भर पाण्यात जाऊन वडाचे झाड कापून वीज तारा मोकळ्या केल्या. त्यामुळे तब्बल 36 तासानंतर खारेपाटणचा वीज पुरवठा सुरळीत झाला. 

हेही पाहा - राम मंदिर पायाभरणी निमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात रोषणाई ; देवीची विशेष खडावाची सालंकृत पूजा

आता दरवर्षी पुराचा धोका 
खारेपाटण शहरात 1961 मध्ये सर्वप्रथम मोठा महापुर आला होता. त्यानंतर 1989 आणि 2007 पुराचा तडाखा बसला; मात्र 2007 नंतर खारेपाटण बाजारपेठ दरवर्षी पुराच्या तडाख्यात सापडत आहे. विजयदुर्ग खाडी गाळात भरत चालली असल्याने दरवर्षी दोन ते तीन दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी येऊन मोठी नुकसानी होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top