सुखनदी पात्राबाहेर, खारेपाटणची स्थिती अशी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

दरम्यान, लॉकडाउनमुळे सलग तिसऱ्या दिवशी खारेपाटण बाजारपेठेत शुकशुकाट होता. अत्यावश्‍यक सेवेची दुकाने खुली असली तरी मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले होते. 

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - येथील सुखनदीचे पात्र धोक्‍याच्या पातळीवरून वाहत असल्याने खारेपाटण शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर बाजारपेठेत पुराचे पाणी येण्याचा धोका आहे. तर विजयदुर्ग खाडीलगतच्या गावातील भातशेती गेले तीन दिवस पाण्याखाली आहे. 

खारेपाटण दशक्रोशीत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे विजयदुर्गखाडीलगतच्या मणचे, मालपे, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले, कुणकवण, शेजवली, वाल्ये, बांधीवडे, चिंचवली या खाडीकाठच्या गावांमधील भातशेती धोक्‍यात आली आहे. तसेच या गावातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. याखेरीज सुखनदीचे पात्र धोक्‍याच्या पातळीवरून वाहत असल्याने खारेपाटण बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनीही दुकानातील साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठीची सज्जता ठेवली आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे सलग तिसऱ्या दिवशी खारेपाटण बाजारपेठेत शुकशुकाट होता. अत्यावश्‍यक सेवेची दुकाने खुली असली तरी मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले होते. 

संरक्षक भिंत उभारणीकडे दुर्लक्ष 
खारेपाटण शहराला दरवर्षी पुराच्या पाण्याचा धोका असतो. गतवर्षी बाजारपेठेत पुराचे पाणी येऊन व्यापाऱ्यांची लाखोंची हानी झाली होती. तसेच जैनवाडीतील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते. पुरापासून खारेपाटणचा बचाव होण्यासाठी नदीकाठी संरक्षक भिंत उभारणीची मागणी नागरिकांची आहे. मात्र अजूनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in kharepatan city konkan sindhudurg