ढगफुटीसदृश पाऊस, गलथान कारभारामुळे अनेक घरांमध्ये घुसले पाणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

नांदगाव येथील 13 जणांचे नुकसान झाले. त्यामध्ये संतोष जाधव यांच्या घरात पाणी शिरले, चिरेबंदी कठडा कोसळला आणि चारचाकीत पाणी साचले. नारायण किसन पवार यांचा चिरेबंदी गडगा कोसळला.

नांदगाव (सिंधुदुर्ग) - कणकवली तालुक्‍यातील असलदे, तोंडवली, नांदगाव, कोळोशी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. महामार्गाच्या गलथान कारभारामुळे अनेक घरात पाणी घुसले तर देवगड निपाणी रस्त्यावर असलदेत झाड कोसळून वाहतूक दोन तास ठप्प झाली. असलदे, नांदगाव, तोंडवली, कोळोशी परिसरात मोठी आर्थिक हानी झाली. 

नांदगाव येथील 13 जणांचे नुकसान झाले. त्यामध्ये संतोष जाधव यांच्या घरात पाणी शिरले, चिरेबंदी कठडा कोसळला आणि चारचाकीत पाणी साचले. नारायण किसन पवार यांचा चिरेबंदी गडगा कोसळला. सुरेश मोरजकर यांच्या घरात पाणी घुसले. पुजा बिडये यांच्या घरात पाणी घुसल्याने वीज उपकरणांचे नुकसान झाले. बाबाजी बिड़ये यांच्या विहिरीची हानी झाली. धर्माज तांबे यांचा चिरेबंदी गडगा कोसळला तसेच कुळिथ शेतीचे नुकसान झाले. 

रमेश पवार, अजय जाधव, स्वप्नील नार्वेकर, गौरीशंभर खोत, सुरेंद्र राणे, दिलीप आचरेकर, सुभाष परब, श्री मसुरकर यांचा चिरेबंदी गडगा पडल्यामुळे नुकसान झाले. विनायक परब, सखाराम चव्हाण यांच्या भात शेतीची हानी झाली. ऋषिकेश मोरजकर यांचेही नुकसान झाले. 
तोंडवलीतील दिलीप शांताराम यांच्या घरात पाणी शिरले. असलदे ग्रामपंचायतीची संरक्षक भिंत कोसळल्याने हानी झाली. 

संबंधितांना केले पाचारण 
नांदगाव येथील हायवे चौपदरीकरणाच्या गलथान कारभारामुळे पाणी घुसल्याने हायवे प्राधिकरण अधिकारी श्री. कुमावत, केसीसी ठेकेदार कंपनीचे श्री. मिश्रा यांना घटनास्थळी पाचारण करीत भरपाई मिळावी, अशी मागणी केली. यावर वरीष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. नांदगाव सरपंच आफोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच निरज मोरये, ग्रामसेवक हरमलकर, प्रभारी तलाठी ए. डी. कांबळे आदींनी पंचनामे केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain konkan sindhudurg