मंडणगडमध्ये मुसळधार श्रावणसरी बरसल्या ; तब्बल एवढ्या पावसाची नोंद

सचिन माळी
Tuesday, 4 August 2020

दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे.

मंडणगड : 'श्रावणात घन निळा बरसला....' या ओळींचा प्रत्यय येणाऱ्या श्रावणसरींची मुसळधार मंडणगड तालुक्यात सुरू आहे. आज दिवसभरात मंडणगड १६५ मिमी, म्हाप्रळ १२० मिमी व देव्हारे १७० मिमी अशा तीन मोजणी केंद्रात एकूण ४५५ मिमी पाऊस झाला आहे. त्याची सरासरी १५१ मिमी राहिली असून तालुक्यात एकूण २०१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा - राजापूरमध्ये अर्जुना कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली ;  व्यापार्‍यांची उडाली तारांबळ... 

श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली होती. तालुक्यात काही ठिकाणी तुरळक सरी येत होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. काल रात्री २ वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरु असून पावसाचा हा जोर कायम आहे.

लावणी केलेली भाताची आणि नाचणीची रोपे तरारली असल्याने शेत हिरवीगार दिसत आहेत. जंगली श्वापदांचा शेतातून उपद्रव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी विविध शक्कल लढविण्यास सुरवात केली. शेतातून बुजगावणी, चित्रविचित्र आवाज काढणाऱ्या दोऱ्या, रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण घातल्याचे चित्र दिसत आहे. मुसळधार पावसासह वाऱ्याच्या वेगामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

हेही वाचा - चिपळूणमध्ये हे शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचितच; ग्रामीण भागात या सुविधेचा अभाव.. 

कोरोना आणि लॉकडाउनमुळे गावोगावी मुंबईकर अडकून पडले आहेत. त्यातील अनेकांनी आपली पावले पुन्हा शेताकडे वळवली असल्याने यावर्षी शेती लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अनेक ओस पडलेल्या खलाट्या लावणी केल्याने पुन्हा हिरव्यागार दिसू लागल्या आहेत. शेतात वाढलेल्या गवत काढणीचे काम सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील गवत मारण्यासाठी पंपाच्या सहाय्याने औषधांची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील भारजा, निवळी या प्रमुख नद्यांसह आसपासच्या गावातील धबधबे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. श्रावणातील निसर्गाचे रूप हळूहळू बदलत असून पाऊस, ऊन, वारा, धुकं यांचा एकत्रित मिलाप होताना दिसत आहे. 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in ratnagiri mandangad