मराठा आरक्षणासाठी लाल महाल ते लाल किल्ला' आंदोलन छेडणार ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 

संदीप खांडेकर
Thursday, 15 October 2020

दिल्लीतील पाया पक्का केला आहे. त्यासाठीच खासदारांना एकत्र करण्याची भूमिका घेतली.

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण व सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी यासाठी 'लाल महाल ते लाल किल्ला' असे आंदोलन छेडण्यात येणार आहे. लाल महाल येथे २९ ऑक्‍टोबरला आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी बैठक होणार असून, दिल्लीत मराठ्यांची ताकद दाखविण्यात येणार आहे. तसा निर्धार सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते. धैर्यप्रसाद कार्यालयात मेळावा झाला. 

यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, "केंद्र व राज्य सरकारकडे नेमके काय मागायचे, याची दिशा निश्चित झाली पाहिजे. सारथी संस्थेला स्वायतत्ता मिळविण्याचा प्रश्न आहे. अन्य संस्थांना स्वायत्तता दिली जात असताना ती सारथीला का नाही, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. संस्थेला निधी मिळविण्याची आवश्यकता आहे.  मराठा आरक्षणाचा लढा सर्वोच्च न्यायालयात जिंकायचा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या पाठबळाची गरज लागणार आहे. केंद्र शासन मनापासून मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रही आहे का, हे तपासून पाहावे लागेल. केंद्र शासनाचा दबाव नसेल तर काहीच होणार नाही. अन्यथा आपण केवळ आरक्षणासाठी भांडत राहू."

ते म्हणाले, "मराठा समाजाने भावनांवर नियंत्रण ठेवावे. खासदार व आमदारांनी पुढे येऊन आरक्षणाच्या अनुषंगाने ठराव मंजूर करावेत. त्याचबरोबर समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लक्ष द्यावे. कृषी, उद्योगधंदे, स्पर्धा परीक्षेत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत‌. राजकीय दृष्ट्यासुद्धा समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मराठा समाज अडचणींवर मात करणारा आहे." समाजाच्या आंदोलनात मी सेवक म्हणून सहभागी होणार आहे. छत्रपती म्हणून नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, "दिल्लीतील पाया पक्का केला आहे. त्यासाठीच खासदारांना एकत्र करण्याची भूमिका घेतली. दिल्लीवर धडक मारण्यासाठी चळवळ आधीच सुरू झाली आहे. दिल्लीवर धडक द्यायची असेल तर पक्के नियोजन करावे लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा दिल्लीत जायला हवा. सारथी संस्थेला स्वायतत्ता मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तत्पूर्वी सारथी संस्थेबाबत प्रबोधन गरजेचे आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून  मराठा समाजाला घडविले शकतो त्याकरिता बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेला निधी कधी येणार?." गरीब मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न आहे. मराठा समाजाचा लढा पुन्हा सुरू झाला आहे. मराठवाड्यात बहुजन म्हणजे दलित व मराठा म्हणजे वेगळा असा समज आहे. त्यामुळे बहुजन ही संकल्पना नेमकी काय, हे तिथल्या लोकांना सांगावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, "आरक्षणाच्या लढाईत शाहू महाराजांनी नेतृत्व करावे. वडिलकीचा अधिकार घ्यावा. सर्व संघटनांना एकत्रित करण्याची त्यांच्यात ताकद आहे." 
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, "करवीर मतदार संघातील प्रत्येक मावळा आरक्षणाच्या लढाईत सहभागी होईल. आरक्षणासाठी जे आंदोलन पुकारले जाईल, त्याला आमचा पाठिंबा असेल."

 राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, "राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. सर्वोच्च न्यायालयात उणीव भरून काढावी. कारण समाजाला फार काळ आम्ही थोपवू शकणार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात एकही कर्ज थकीत नाही. प्रामाणिक व सचोटीने कर्ज घेणारा मराठा समाज आहे. आरक्षणाची लढाई या गुणांच्या जोरावर तो लढत आहे."

अॅड. गुलाबराव घोरपडे म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्याने दिशा द्यावी. लाल महालमध्ये सारथीकरिता प्रातिनिधिक आंदोलन करण्याची वेळ आली आहे. 
सतराव्या शतकातील मराठा समाजाची ताकद दाखवावी लागेल."  इंद्रजित सावंत यांनी सारथी संस्थेला १३० कोटी बजेट देऊन उपयोग नाही, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले, "पोकळ लढाया लढण्यापेक्षा घटनेत बदल आवश्यक आहे. त्याकरिता दिल्लीला तत्काळ धडक मारावी लागेल. त्याची सुरुवात कोल्हापूरपासून करायला हवी. हे आंदोलन दिल्ली तख्ताला जाग आणणारे असेल."

 भय्या माने, नगरसेविका रुपाराणी निकम यांनी सर्जेराव पवार (शिरोळ), नितीन कळभर (कागल), मारुती मोरे (आजरा), विष्णू जोशीलकर (चंदगड), शशिकांत पाटील (कोल्हापूर), सुनील पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर (जिल्हा परिषद सदस्य), अमरसिंह पाटील (पन्हाळा), शैलेश भोसले (महिला आघाडी), रवी पाटील (वडणगे), लाला गायकवाड (कोल्हापूर), प्रल्हाद पाटील (घुणकी), कमलाकर जगदाळे (कोल्हापूर), विजय शिंदे (पेठवडगाव), अमर पाटील (शाहूवाडी), समाधान इंदळकर (मुरगुड) यांनी सूचना केल्या.

हे पण वाचाएकनाथ खडसे आमचे नेते  ते पक्ष सोडणार नाहीत ;  चंद्रकांत पाटील 

ठराव असे 
२९ ऑक्टोबर चलो पुणे सारथी बचाव संकल्प यात्रा
- राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक सारथी संस्थेची स्वायत्ता  व अन्य मागण्यांसाठी राज्यातील सकल मराठा समाज पुण्यात लाल महालात एकवटणार

- १९ ऑक्टोबरला राज्य सरकारला सारथी संस्थेची स्वायत्तता व अन्य मागण्यांसाठी निवेदन देणार

- मागण्या सरकारने १० दिवसांत पूर्तता न केल्यास २९ ऑक्टोबरला सकल मराठा राज्यातून ताकदीने पुणे येथे वाहनाने लालमहालात जाणार असून, सारथीची स्वायत्तता व मागण्यांसाठी लाल महालात जाऊन संकल्प करणार 

- लालमहाल येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार. यानंतर मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत होणाऱ्या आंदोलनाची जबादारी सरकारची राहील

- राज्य सरकारने अखत्यारीतील मागण्यांची पूर्तता तातडीने करावी.
 अ) प्रवेश प्रक्रियामध्ये एसइबीसी अंतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवेश संरक्षित करा
ब) २० शासकीय विविध विभागात विभागातील स्थगितीपूर्व मराठा निवड उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या ताबडतोब द्याव्यात

- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने विद्यार्थी शिक्षण कर्ज योजना सुरू करावी. शून्य टक्के कर्ज थकबाकी असल्याने लाभार्थी संख्या वाढवावी

- दसरा चौक ठिया आंदोलन काळात आत्मबलिदान दिलेल्या विनायक परशराम गुदगी यांच्या वारसास नोकरी व मदत त्वरित द्यावी

- कोपार्डीच्या बहिणीला न्याय द्यावा

- सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावा

- केंद्र सरकारने मराठा आरक्षणाला मदत केली पाहिजे म्हणून सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला धोका होऊ नये म्हणून कायदा बदल करावा. अन्यथा फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन काळात चलो दिल्ली आंदोलन करणार असून, साडेचार कोटी मराठ्यांच्या अस्तित्वासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात येईल. मराठा आरक्षण कायदेशीररित्या मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवली जाईल.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha community rally in kolhapur