वेंगुर्ले तालुक्‍यात मुसळधार, 24 तासांत 109 मि.मी.

दीपेश परब
Tuesday, 22 September 2020

पावसाचा जोर कायम असल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. तालुक्‍यातील ग्रामीण भागात पुलांवर पाणी आल्याने काही मार्गही ठप्प झाले.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे ठिकठिकाणी काही पुलांवर पाणी आल्याने मार्ग ठप्प झाले. भात कापणीच्या तोंडावर पावसाने जोर धरल्याने भातशेतीचेही मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात 24 तासांत 109 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारपर्यंत कोणतीही पडझड झाली नसल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. 

पावसाचा जोर कायम असल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. तालुक्‍यातील ग्रामीण भागात पुलांवर पाणी आल्याने काही मार्गही ठप्प झाले. सावंतवाडी-तुळस मार्गे वेंगुर्लेल्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर होडावडा-तळवडे गावांना जोडणाऱ्या मुख्य पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

वाहतूक मातोंड मार्गे वेंगुर्ले अशी वळवण्यात आली. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ग्रामीण भागात नुकताच भात कापणीला प्रारंभ झाला होता. काही भागात भातही कापणीसाठी आले होते; मात्र या पावसामुळे शेतात पाणी साचून भातशेती जमिनीवर पडून मोठे नुकसान झाले. हातात आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in vengurla sindhudurg district