रत्नागिरीला झोडपले; दिवसात पाच लाखांवर नुकसान

heavy rainfall in ratnagiri district
heavy rainfall in ratnagiri district

रत्नागिरी : मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. संगमेश्‍वर, राजापुरात घरे, गोठे, मंदिरांजवळ संरक्षक भिंती, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये मालमत्तांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. रत्नागिरीत मिऱ्या-अलावा येथे गटारीचे पाणी तुंबल्यामुळे एका घरात पाणी शिरले होते. 

बुधवारी (ता. 17) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 51.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संगमेश्‍वरात 147 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून राजापुरात 82, चिपळुणात 63, गुहागरात 52 मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरी, लांजा, दापोली, मंडणगड या तालुक्‍यांमध्ये 40 मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस पडला असून ठिकठिकाणी पाणी साचले होते. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक खंडित झाली होती. 

मंगळवारपासून (ता. 16) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढला. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील नद्या आणि धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून समुद्रही खवळलेला आहे. पावसामुळे दापोलीत पिसाई गावाजवळ झाड पडल्याने वाहतूक बंद होती. ते झाड काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. देवरूख येथील रेशमा करंडे यांच्या घराचे 20 हजार रुपये, मुचरी येथील घरांचे पावणेचार लाख रुपयांचे, बेलारी येथील माध्यमिक शाळेची संरक्षक भिंत कोसळून 35 हजार, माखजन येथे घराजवळ संरक्षक भिंत कोसळून शाळेचे नुकसान झाले. मावळंगे येथे ओगले यांच्या घराजवळ संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. रत्नागिरी तालुक्‍यात शिळ येथे पंडयेवाडीत रस्त्यावर शिळ धरणाच्या पाईपलाईनसाठी रस्त्याच्या दोन मोऱ्या काढल्यामुळे भगवती मंदिरजवळ पाणी तुंबले. राजापूर बेदखेळे येथील सदू गणू म्हादे यांचा गोठा कोसळून दोन बैल जखमी झाले, तर कोदवली येथे महाकाली देवस्थानजवळ दरड कोसळली. रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या आलावा येथे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले होते. 

कोकणात अतिवृष्टीचा इशारा
अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे वेगवान वारे वाहत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. 18) मुसळधार पाऊस पडेल. कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे रेड ते ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com