मुसळधार पावसाने सिंधुदुर्गात भाताचे नुकसानसत्र सुरूच 

एकनाथ पवार
Tuesday, 20 October 2020

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर वैभववाडी आणि खारेपाटण परिसरात तर अतिवृष्टी झाली होती.

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी सायंकाळी विजांच्या लखलखाटांसह जोरदार पाऊस झाला. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. उर्वरित तालुक्‍यांमध्येही सरी कोसळल्या. पावसामुळे जिल्ह्यातील भातपिकांचे नुकसान सुरूच असून भातकापणीत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दिवसागणिक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.
 
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी आणि खारेपाटण परिसरात तर अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरस्थिती होती. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. खारेपाटण परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखालीच राहिल्याने कुजून गेली. जिल्ह्याच्या अनेक भागात भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांची कापणी करण्याच्या कामाला शेतकरी लागला होता. एक दोन दिवस शेतकऱ्यांनी कापणी देखील केली; परंतु पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. 

सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर विजांच्या कडकडाटांसह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली तालुक्‍यांमध्ये तासाभरापेक्षा अधिक काळ मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्‍याच्या काही भागात देखील जोरदार पाऊस झाला. किनारपट्टीच्या तालुक्‍यांमध्ये विजांचा कडकडाट झाला; परंतु या तीनही तालुक्‍यांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. 

जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी सकाळपासून काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. पीक हातातून जात असल्यामुळे शेतकरी कोणतीही पर्वा न करता कापणी करीत आहे. दुपारीच पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या भाताची आवराआवर करताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. काही शेतकऱ्यांचे कापणी केलेले भात पावसात भिजले. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानसत्र सुरूच आहे. 

पावसाचा इशारा 
जिल्ह्यात 23 ऑक्‍टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातउत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भातपीक परिपक्‍व असून कापणी स्थितीत आहे; परंतु पावसामुळे कापणीत अडथळा निर्माण होत आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains continue to damage paddy in Sindhudurg