सिंधुदुर्गात `या` गावात पावसाने उडाली दाणादाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

कसाल कोलते हॉस्पिटलजवळ असलेल्या दोन घरांत पाणी घुसल्याने महसूल यंत्रणेने दोन्ही घरातील सहा माणसांना रेस्क्‍यू मोहिम राबावत घराबाहेर काढले. ओरोस ख्रिश्‍चनवाडीला पाण्याने वेढले असून येथील आठ घरातील माणसांना दुसऱ्या ठिकाणी हलविले आहे

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज सकाळी अचानक रूद्ररूप धारण केले. याचा मोठा फटका ओरोस व कसाल या महामार्गानजिक असलेल्या गावांना बसला. येथील महामार्गाची उंची वाढविल्याने पाण्याचे प्रवाह बदलत पाणी नजिक असलेल्या घरांमध्ये घुसले.

कसाल कोलते हॉस्पिटलजवळ असलेल्या दोन घरांत पाणी घुसल्याने महसूल यंत्रणेने दोन्ही घरातील सहा माणसांना रेस्क्‍यू मोहिम राबावत घराबाहेर काढले. ओरोस ख्रिश्‍चनवाडीला पाण्याने वेढले असून येथील आठ घरातील माणसांना दुसऱ्या ठिकाणी हलविले आहे. या दोन्ही गावांच्या इतिहासात प्रथमच हायवे नजिक वस्तित पाणी घुसन्याचा प्रकार घडला. महामार्ग प्राधिकरणने पाण्याच्या प्रवाहाचे नियोजन न करता येथील मुंबई-गोवा महामार्गाचे काम केल्याने नागरिकांची ही नुकसानी झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. 

या पावसाने ओरोस गावातही नाले दुथडी भरून वाहू लागल्याने आणि सकल भागात पाणी साचल्याने ओरोसमध्ये पाणीच पाणी दिसत होते. काही ठिकाणी घरात तर काही दुकांनामध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. महामार्गाच्या कामामुळे पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने तसेच बदलले गेल्यामुळे ओरोस व कसाल गावात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी शिरले. 

आज सकाळी ओरोस पंचक्रोशीत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. कसाल व ओरोस गावात महामार्गाचे चौपदारीकरण करण्यात आले आहे. यावेळी रस्त्याची व ब्रिजची उंची वाढविण्यात आली आहे. परिणामी पाण्याचा निचरा करणारे मार्ग महामार्गामुळे बंद झाले. ओरोस गावात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

जैतापकर कॉलनी येथे पाणी साचले होते. हे पाणी येथील डॉ. मंगेश पावसकर यांच्या घरात शिरले होते. तसेच येथे असलेल्या विहिरीतही पाणी गेले. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने शेखर सावंत यांच्या घरात पाणी शिरले होते. प्राधिकरण क्षेत्रातील नाल्यांची सफाई केली नसल्याने नाल्याचे पाणी वालावकर कॉम्प्लेक्‍स पर्यंत आले होते. ओरोस फाटा येथील ऑट्रापार्क नजिकच्या नाल्याला पुर आल्याने जाधववाडी मधील घरांमध्ये पाणी शिरले होते. ओरोस ख्रिश्‍चनवाडी येथील खालसा ढाबा परिसरात पावसाचे पाणी साचल्याने येथील दोन ते तिन घरात पाणी शिरले होते. 

प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने नाल्यातील गाळ काढला नसल्याने ओरस ख्रिश्‍चनवाडी पूर्ण पाण्याखाली गेली होती. ख्रिश्‍चनवाडीतील रोमिओ फर्नांडिस व पाथरीस फर्नांडिस यांची घरं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. तर अन्य लोकांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नदीचा प्रवाह वाढून ते पाणी शंभर मीटर अंतरावर असलेल्या ओहळात घुसले व बाजूलाच असलेल्या ख्रिश्‍चनवाडीला या पाण्याने वेढले व सर्व घरे पाण्याखाली गेली. ख्रिश्‍चनवाडीला लागून असलेले हॉटेल राजधानी हे देखील पाण्याखाली गेले आहे. 

संबंधित ठेकेदार कंपनीने नदीवर ब्रीज बांधताना नदीतील गाळ तसाच ठेवल्याने मुसळधार पावसामुळे नदीने आपले क्षेत्र ओलांडून बाजूच्या ओहळात प्रवेश केला. गेले दोन वर्ष या ओहळाचा गाळ काढला नसल्याने ओहळातील पाणी शेजारी ख्रिश्‍चनवाडीत घुसले व यात सात ते आठ घरे पाण्याखाली गेली.

सुरक्षितेचा उपाय म्हणून तेथील रहिवाशांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन त्या नाल्यातील गाळ काढावा, अशी मागणी रोमिओ फर्नांडिस यांच्याकडून करण्यात आली आहे. ओरोस डॉन बॉस्को स्कूल नजिकच्या रस्त्यावर ही पाणी साचले होते. 

पावसाने आलेल्या पाण्याचा फटका कसाल गावाला सुद्धा बसला आहे. येथे सुद्धा पाण्याचे प्रवाह बदलल्याने ही आपत्ती ओढवली. महामार्गाची उंची वाढविल्याने येथील पाण्याचा प्रवाह बदलत तो कोलते हॉस्पिटलकडे वळला. परिणामी येथील देविदास कृष्णा जाधव यांच्या घरामध्ये ओहोळाचे पाणी गेले.

यावेळी त्यांचे घरात श्रीमती अर्चना देविदास जाधव (वय 53), सुप्रिया देविदास जाधव (वय 27), योगेंद्र देविदास जाधव (वय 29) या तीन व्यक्ती होत्या. या तिघांना गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी कसाल यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी रेस्क्‍यू मोहिम राबविण्यात आली. तहसीलदार कुडाळ देखील घटनास्थळी आले होते. येथील रूबेट फर्नांडिस यांच्याही घरात पाणी घुसल्याने घरातील 3 व्यक्तींना बाहेर काढावे लागले. 

याचा फटका कसाल हायस्कूलला बसला आहे. हायस्कूल परिसर पूर्ण पण्याखाली होता. कुंभारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने वाडीत जाणारी वाहतूक थांबली होती. हायस्कूल नजिक असलेल्या महेश मालंडकर यांच्याही घरात पाणी घुसले. येथील महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बागवेवाडी येथे असलेल्या विज वितरणच्या ट्रान्सफार्मरपर्यंत पाण्याची उंची वाढली होती. सुरक्षितता म्हणून या ट्रान्सफार्मरला प्लास्टिक पिशवी बांधन्यात आली होती; मात्र दुपारनंतर पाऊस काही प्रमाणात थांबला. संततधारा दुपारनंतरही तशाच सुरु राहिल्या असत्या तर मोठ्या नुकसानीची शक्‍यता होती. 

काजूची 100 पोती भिजली 

ओरोस ख्रिश्‍चनवाडी येथील प्रसाद मालंडकर यांच्या काजू फॅक्‍टरीत असलेली काजूची 100 पोती भिजली. यामुळे मालंडकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशांत राणे, पॅट्रीस फर्नांडिस, रोमिओ फर्नांडिस, यांच्या घरांत पाणी घुसले. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains Hit Oros And Kasal City Sindhudurg Marathi News