अतिवृष्टी ! वैभववाडीत दोन लाखांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

वादळीवारा आणि मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील घरे, गोठे आणि इतर मालमत्ताचे नुकसान झाले आहे. करूळ येथील आनंद दत्ताराम माळकर यांच्या गोठा कोसळुन 4 हजार 400 रूपयांचे नुकसान झाले आहे.

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात गेले तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीत घरे, गोठे, शेती पंप आणि इतर मालमत्ताचे सुमारे 1 लाख 73 हजार 450 रूपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्‍यात आज पावसाचा जोर ओसरला असुन वाऱ्याचा वेग मात्र कायम आहे. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

तळेरे-कोल्हापुर मार्गावरील वाहतुक दुसऱ्या दिवशीही बंद आहे. 
तालुक्‍यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे मोठी पडझड झाली. तळेरे -कोल्हापुर मार्गावरील असळज, मांडकुलीसह विविध ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे यामार्गावरील वाहतुक सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहे. शेकडो अवजड वाहने वैभववाडी ते करूळ या मार्गावर अडकली आहेत. 

वादळीवारा आणि मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील घरे, गोठे आणि इतर मालमत्ताचे नुकसान झाले आहे. करूळ येथील आनंद दत्ताराम माळकर यांच्या गोठा कोसळुन 4 हजार 400 रूपयांचे नुकसान झाले आहे. तर सांगुळवाडी येथील अशोक धोंडजी रावराणे यांचा दीड लाख रूपये किमंतीचा शेतीपंप पुराच्या पाण्यातुन वाहुन गेला आहे.

उंबर्डे मेहबुबनगर येथील अमित नाचरे यांच्या घराची भिंत कोसळुन 3 हजार 500 रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याच वाडीतील मनसुर याकुब रमदुल यांच्या घराचे 3 हजार रूपयांचे नुकसान झाले. तिथवली येथील नम्रदा शांताराम ईस्वलकर यांच्या घराचे 3 हजार रूपये तर संजय विष्णु शिवगण यांच्या गोठ्यांचे 2 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तिथवली दिगशी येथील उर्मिला लाडका मोरे यांच्या घरात पुराचे पाणी घुसुन धान्याची नासाडी झाली. त्यांचे 1 हजार 500 रूपये, खांबाळे गेळये येथील पांडुरंग धोंडु शेळके यांच्या घराची भिंत कोसळुन 3 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. भोम येथील ज्ञानदेव सखाराम भालेकर याचे 1 हजार रूपये, मारूती दत्ताराम भालेकर यांचे 1 हजार तर अशोक रामचंद्र सांवत 450 रूपयाचे नुकसान झाले आहे. याशिवाय शेतीचे देखील नुकसान झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains Lash Vaibhawadi Sindhudurg Marathi News