संगमेश्वर तालुक्यात पावसाची दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

संगमेश्वर : गेले सलग तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात दाणादाण उडवली आहे. तालुक्यातील फुणगुस, माखजन, डिंगणी, संगमेश्वर येथे पुराचे पाणी घुसले असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील बहुतांश सर्व मार्गावरची एस टी वाहतूक बंद असून पहाटे पासून वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

संगमेश्वर : गेले सलग तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात दाणादाण उडवली आहे. तालुक्यातील फुणगुस, माखजन, डिंगणी, संगमेश्वर येथे पुराचे पाणी घुसले असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील बहुतांश सर्व मार्गावरची एस टी वाहतूक बंद असून पहाटे पासून वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

गेल्या २४ तासात तालुक्यात १८५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून पावसाने आजपर्यंत ३ हजार मिमीची सरासरी गाठली आहे. शनिवारपासून आजपर्यंत तालुक्यात ५०० मिमी पाऊस कोसळल्याने शास्त्री, सोनवी, गड, बाव, सप्तलिंगी, काजळी या प्रमुख नद्याना पुर आला आहे. आज सलग चौथ्या दिवशी संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी आहे. माखजनला गडनदिच्या पुराने कहर केला असुन १० गावांचा संपर्क तुटला आहे. माखजन बाजारपेठेत ५-६ फुट पाणी आहे. डिंगणी खाडिभागात आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे. फुणगुस बाजारपेठेत ५-६ फुट पाणी असुन कालची रात्र ग्रामस्थांना जागुन काढावी लागली.  

तालुक्यातील उक्षी मोहल्ल्यात पहाटे ४ वाजता पुराचे पाणी घुसून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. कसबा मोहल्ला येथे शास्त्री नदिचे पाणी घुसल्याने अंतर्गत १० गावांमधील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. बावनदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने रात्रभर बावनदी पुलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती तर सोनवी पुल बंद करण्यात आल्याने मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. पुरस्थितीमुळे एस टी ने खबरदारी म्हणून अंतर्गत मार्गावरील वाहतूक बंद केल्याने तालुक्यातील दळणवळण ठप्प झाले आहे. देवरुख - संगमेश्वर राज्य मार्गावर तीन ठिकाणी पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत आहे. आज पहाटे मुख्य विज वाहिनीत बिघाड झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील विज पुरवठा खंडित आहे. बीएसएनएलसह काही खासगी कंपन्याचे नेटवर्क गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे आज संपूर्ण तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुराचा धोका वाढण्याची भिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Sangamehswar Ratnagiri