#KonkanRain सिंधुदुर्गात अतिवृष्टी 

#KonkanRain  सिंधुदुर्गात अतिवृष्टी 

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात काल (ता.10) रात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीने अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. माणगाव खोऱ्यासह अनेक गावे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने संपर्कहीन बनली. खारेपाटण शहराला पुराने वेढा घातला. वेंगुर्ले तालुक्‍यातील काही गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला.

महामार्गावर काही ठिकाणी चिखल आल्याने तर बांद्यात मार्गात पाणी आल्याने वाहतुक विस्कळीत झाली. पावसाचा जोर कायम असल्याने पुरजन्यस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात 53 घरे व 9 गोठ्यांची पडझड होवून सुमारे 90 लाखाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. आजच्या पावसाने यात मोठी भर पडण्याची शक्‍यता आहे. घरावर, गोठ्यावर झाडे पडून व वादळी वाऱ्यामुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत संबंधीत यंत्रणेकडून पंचनामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी येवून वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला आहे. 

सह्याद्रीच्या रांगांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. सावंतवाडी तालुक्‍यात नदी-नाल्यांना पूरस्थिती आल्याची स्थिती होती. अनेक नागरिकांना, शाळकरी मुलांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. तळवडे गावातील होडावडे- तळवडे मार्गावरील पुलावर आज पुन्हा पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली होती. बांदा शहर व परिसराला मुसळधार आज पावसाने झोडपून काढले. सटमटवाडी येथे टोल नाक्‍याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने ओहोळाच्या तोंडावर भिंत बांधल्याने मुंबई-गोवा महामार्गावर गुडगाभर पाणी आले होते. त्यामुळे दुपारी महामार्गाच्या दुतर्फा दोन तास वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. शहरातही आळवाडी बाजारपेठ व निमजगा येथील भंगार वस्तीत पाणी घुसले होते. 

तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेर्ले येथील जुने कापई पूल पाण्याखाली गेले होते. बांदा-वाफोली रस्त्यावरील पाटकर बागेजवळील पूल देखील पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक दिवसभर बंद होती. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहू लागल्याने लगतच्या शेतीत पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले. या नदीतून आरोसबाग येथील शाळकरी मुलांना होडीतून धोकादायक प्रवास करावा लागला. 

दोडामार्ग तालुक्‍यातही पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तालुक्‍यातील कमी उंचीचे सर्व पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे वस्तीच्या गाड्या त्या त्या गावात अडकून पडल्या. साटेली भेडशीतील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने सकाळी साडेनऊ पर्यंत दोडामार्ग तिलारी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घोटगेवाडी पूल रात्रीच पाण्याखाली गेला होता. 

कुडाळ तालुक्‍यात भंगसाळ, निर्मला, बेल आदी प्रमुख नद्यांनी धोक्‍याची पातळी गाठली. शहरालगतचा आंबेडकरनगर परिसर जलमय झाला. अनेक ठिकाणी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने शेती पाण्याखाली गेली. पावसामुळे चौपदरीकरणाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला आज पहाटेपासून पुर आला. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील अनेक गावे संपर्कहीन झाली. सावंतवाडी व कुडाळ आगाराच्या अनेक एसटी बस पुलाच्या पलीकडे अडकल्या आहेत. 

वेंगुर्ले तालुक्‍यातील आडेली, वजराठ, वेतोरे, केळुस या गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे, विद्युत खांब तसेच नदींना पूर आल्याने वेंगुर्ले-सावंतवाडी मुख्य मार्गासह इतर गावांना जोडणारी वाहतूक ठप्प होती. घरांची छप्परे व बागायतींचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. 
मालवण तालुक्‍यात पावसाच्या तडाख्याने अनेक भागात वीज वाहिन्या तुटल्या. ठिकठिकाणी पडझडीचेही प्रकार घडले. महावितरणच्या नुकसानीबरोबरच वीज पुरवठा अनेक ठिकाणी ठप्प झाला. 

कणकवली तालुक्‍यातील खारेपाटणला पुराने वेढा घातला. तालुक्‍यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पडझडीचे प्रकार घडले. शेतीचेही नुकसान झाले. देवगडमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. 
वैभववाडी तालुक्‍यात करूळ रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वैभववाडी-कोल्हापुर मार्गावरील वाहतुक अर्धा तास ठप्प होती. पुराच्या पाण्यामुळे नायदेवाडी, दिगशी या गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्‍यात संभाव्य धोका ओळखुन अनेक शाळा दुपारीच सोडण्यात आल्या. सोनाळी येथील अभिनव मंदीर इंग्लिश मेडियम स्कुल परिसरात पुराचे पाणी घुसले. तालुक्‍यातील शुक, शांती नद्या पुररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. 

तडाखा पावसाचा... 

  • अतिवृष्टीने मुंबईहून येणाऱ्या रेल्वे दोन तास उशिरा 
  • वेंगुर्ले तालुक्‍यात चक्रीवादळाचा तडाखा 
  • माणगाव खोऱ्यातील अनेक गावे संपर्कहीन 
  • चुकीच्या कामांमुळे मुंबई गोवा महामार्ग विस्कळीत 
  • सह्याद्रीच्या रांगांमध्ये पावसाचा जास्त जोर 
  • मालवणात महावितरणचे मोठे नुकसान 
  • धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ 
  • देवघर धरणाचे पाणी आज सोडणार 

अतिवृष्टीचे सावट कायम 
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 11 ते 15 तारखेदरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणा, मच्छीमार आणि जिल्हावासिय जनतेला आवश्‍यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com