#KonkanRain मसुरेतील खोत जुवा बेटास पाण्याचा वेढा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मालवण - समुद्री उधाणाचा जोर आजच्या तिसऱ्या दिवशीही वाढल्याने त्याचा फटका देवबाग, दांडी किनारपट्टी भागास बसला. किनारपट्टी भागाबरोबरच सागरी उधाणामुळे कालावल खाडीपात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मसुरेतील खोत जुवा बेटास पाण्याने वेढा घातल्याचे दिसून आले. खाडीपात्राचे पाणी बेटावर घुसल्याने माडबागायतींना धोका निर्माण झाला आहे. चहूबाजूने पाणी बेटावर घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला होता. यात समुद्री उधाणामुळे समुद्राच्या अजस्र लाटांचा मारा किनारपट्टीस बसत होता. देवबाग किनारपट्टीस आजही समुद्राच्या लाटांचा तडाखा बसला. उधाणाचे पाणी आजही वस्तीत घुसले होते. देवबागवासीयांवर मोठे संकट कोसळले असताना प्रशासनाकडून मात्र याकडे गांभीर्याने लक्ष पुरवीत आवश्‍यक उपाययोजना तत्काळ राबविल्या जात नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

देवबाग किनारपट्टीसह दांडी येथील किनारपट्टीस उधाणामुळे समुद्री लाटांचा तडाखा बसला. पाच वर्षांपूर्वी दांडी किनाऱ्यालगत काही ठिकाणी घातलेल्या बंधाऱ्यामुळे दांडेश्‍वर, चौकचार या दोन मंदिरांचा धोका टळला आहे. 

किनारपट्टी भागाबरोबरच मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. खाडीपात्रेही तुडुंब भरून वाहत असून त्यांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. कालावल खाडीपात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मसुरेतील खोत जुवा बेटास चहूबाजूने पाण्याने वेढा घातला आहे. खाडीपात्रातील पाणी थेट बेटावर घुसल्याने तेथील घरांना तसेच माडबागायतीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बेटास धोका पोचू नये, यासाठी शासनाकडे गेली काही वर्षे संरक्षक बंधाऱ्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्यावरील कार्यवाही अद्याप न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Sindhudurg District Masure juva island