सिंधुदुर्गात भिजवणी, हावळी भाताचे अतोनात नुकसान

एकनाथ पवार
Wednesday, 23 September 2020

होडावडा पुलाजवळी एका घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्या कुटुंबाला स्थलांतरीत करण्यात आले होते.

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्याच्या काही भागाला मंगळवारी पुन्हा मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुराचा धोका कायम आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात पावसाचा जोर जास्त होता. तेथे होडावडा येथील एका घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्या कुटुंबातील पाच सदस्यांना स्थलांतरित करण्यात आले. 

संततधारेमुळे जिल्ह्यातील भिजवणी आणि हळवी भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एकूण 1103.400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. 21) पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, दोडामार्ग, कुडाळ, देवगड तालुक्‍यांना झोडपून काढले. या तालुक्‍यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. मालवण आणि वेंगुर्ले तालुक्‍यात 250 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळित झाली.

सोमवारी रात्री पावसाने थोडी उसंत घेतली होती; परंतु मंगळवार सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात झाली. कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ तालुक्‍यांच्या काही भागात सोमवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर वाढला. वेंगुर्ले तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी या तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. होडावडा पुलावरून पुराचे पाणी वाहत असून तेथील मारीया आंद्रुलुईस ब्रिटो यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे त्या कुटुंबातील मारीया यांच्यासह पीटर आंद्रुलुईस ब्रिटो, लॉरेन्स आंद्रुलुईस ब्रिटो, त्रिजा पीटर ब्रिटो, विल्यम पीटर ब्रिटो या पाच जणांना नातेवाईकांच्या घरी हलविले आहे. होडावडा पुलाजवळील भातशेतीमध्ये पाणी घुसले आहे. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले. 

कणकवली आणि वैभववाडी या दोन तालुक्‍यांतील सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कापणीला आलेली भिजवणीची भातशेती आणि हळवी भात पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. हळवी भात पिके काही भागात कापणीला आली आहेत. परिपक्व भात पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान होणार आहे. जिल्ह्यात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर आणखी एक-दोन दिवस कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

समुद्रही खवळलेला 
जिल्ह्याच्या किनारपट्टीला पावसाला जोर अधिक आहे. मालवणात 264 तर वेंगुर्लेत 254 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समुद्रदेखील खवळलेला आहे. त्यातच हवामान खात्याने जोरदार वारे वाहण्याची शक्‍यता वर्तविल्यामुळे सर्वात सुरक्षित मानल्या गेलेल्या देवगड बंदरात शेकडो नौकांनी आश्रय घेतला आहे

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Sindhudurg, major damage to paddy fields