चिपळूणात अत्यावश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

चिपळूण शहरात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. मात्र, मंगळवारी शहरात अत्यावश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली.

चिपळूण ( रत्नागिरी ) - चिपळूण शहरात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. मात्र, मंगळवारी शहरात अत्यावश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. कोरोनाबाधितांची संख्या राज्यात वाढत असल्याने 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढण्याच्या भितीने लोक तीन महिने लागेल इतक्‍या जीवनावश्‍यक वस्तू घेताना आज आढळून आले. 

कोणत्याही कारणास्तव गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरात जीवनावश्‍यक वस्तूंची घरपोच सेवा सुरु करण्याची योजना पालिकेने सुरू केली असली तरी नागरिक त्याला फारसा प्रतिसाद देत नाहीत. आजही किराणा मालाच्या दुकानासमोर, भाजीच्या गाड्यासमोर, पेट्रोल पंपावर गर्दी होताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात होते.

शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास व शेतमालाची बाजारापर्यंत वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. दुधाची विक्री करणाऱ्या दुधवाल्यांना पोलिसांनी त्रास देवू नये, अशाही सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. नागरिकांनी नियम पाळावेत म्हणून महसुल विभाग, सरकारी कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. मात्र परिस्थितिचा फायदा घेवून काही किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, इतर जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जादा फायदा मिळवीत आहेत. गोवळकोट रोडवर हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्यावर महसुलकडून कारवाई केली. 

सूक्ष्म नियोजनाची गरज आहे, लॉकडाऊनमुळे 24 तास धावपळ करणाऱ्या लोकांना हे पचनी पडत नाही. नेहमीच गडबडीत असणाऱ्या माणसाला संपूर्ण दिवसभर घरात बसून राहणे अवघड जात आहे. त्यातच अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने, आता दंडुक्‍याचा धाक दाखविण्यापेक्षा पोलिस प्रशासनाने गर्दी करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
- विनायक आपटे, चिपळूण 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rush To Buy Essential Commodity In Chiplun