esakal | कोकणात महिलांना दिली 'उमेद' ; समूह शेतीतून मिळवले दीड लाखांचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

with the help of self held group the women in konkan doing variety of crops in lockdown period

बचत गटाच्या महिलांनी समूह शेती करत लॉकडाउन काळात विविध प्रकारची पिके घेत आर्थिक उन्नती साधली आहे. 

कोकणात महिलांना दिली 'उमेद' ; समूह शेतीतून मिळवले दीड लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी : स्त्री ही अबला नसून सबला आहे हे तालुक्‍यातील सरमळेतील महिलांनी दाखवून दिले आहे. येथील प्रगती महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी समूह शेती करत लॉकडाउन काळात विविध प्रकारची पिके घेत आर्थिक उन्नती साधली आहे. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद अभियानामधून प्रेरणा घेवून तब्बल 1 लाख 60 हजार 289 रुपयांची कमाई करत बचतगटातून कसा रोजगार उपलब्ध करता येईल याचे दिशादर्शक उदाहरण समोर आणले.

2017ला प्रगती समूह स्वयंसहायता गटाची स्थापनाच मूळात महिलांची संघटीत ताकद दाखवण्यासाठी झाली. उमेद अभियानाच्या रेवती सावंत यांनी यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. सावंत यांनी समूह शेती संकल्पना राबवण्याचा विचार केला. रोजीरोटीचा प्रश्‍न, पिकवलेल्या भाजीपाल्यातून एक बाजारपेठ निर्माण करावी या उद्देशाने बचत गटातील महिलांनी समूह शेतीचे प्रात्यक्षिक करण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा -  पावणेदोनशे दिवसांचे कोकणी जीवन उलगडले लॉकडाउनच्या डायरीतून

2018 पासून या बचत गटातील महिलांनी शेतीस सुरुवात केली. भाजीपाला, भात, नाचणी, विविध कडधान्ये आदी पिके घेतली जाऊ लागली. रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात शेतीचा निर्धार केला आणि तो यशस्वीही केला. आता पिकांना बाजारपेठ कशी मिळेल याचेही त्यांनी यशस्वीरित्या नियोजन केले. भाजीपाला व धान्य गावच्या बाजारपेठेत घाऊक पद्धतीने विक्रीस सुरुवात केली. 

कालांतराने आणखी काही क्षेत्र त्यांनी लागवडीखाली आणले. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत या गावातील महिलांना उत्पादक गटासंदर्भात सेंद्रिय शेती तालुका समन्वयक तालुका अभियान कक्षाचे प्रदीप ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. या गावात आणखीन तीन उत्पादक समूह तयार झाले. या गटामध्ये प्रगती महिला समूहातील महिलांनी एकजुटीने एकत्र येऊन वसुंधरा उत्पादक भाजी विक्री केंद्राची निर्मिती यंदाच्या मार्चमध्ये केली. हे या गटाचे मोठे यश होते. यानंतर या गटातील महिलांनी गावातील तब्बल एक एकर शेती लागवडीखाली आणली. या गटासाठी "उमेद" कडून दोन लाखांचे अनुदान मिळाले. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत या गटाला तब्बल 60 हजार 289 रुपये फायदाही झाला. समूह शेतीमुळे बचत गटातील महिलांमध्ये नवउमेदही तयार झाली आहे. 

"सभा घेणे, बचत करणे एवढेच काम चालायचे; मात्र तालुका समन्वयक प्रदिप ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून दोन लाखांचा निधी मिळाला. यामुळे भाजीपाला लागवड करून भाजीपाला खरेदी विक्री केंद्राची स्थापना केली. यामध्ये 1 लाख 60 हजार 289 रुपयांचा फायदा झाला." 

- संजना संतोष सरमळकर, अध्यक्ष, वसुंधरा उत्पादक गट

हेही वाचा - कोकणात सुपारीला लागतीये बुरशी ; उत्पन्नात होतीये घट 

 

"अभियानातून गटाला दोन लाख निधी मिळाल्यामुळे कोरोना काळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकलो. या अभियानामुळे वैयक्तिक जीवनात खूप मोठा बदल झाला आहे."

 - रसिका रविंद्र डोईफोडे, सचिव वसुंधरा उत्पादक गट 

"बचत होते; पण उपजिवीकेचे काय? हा प्रश्‍न होता. त्यानंतर उत्पादक गट निर्माण करून दोन लाखांचा निधी मिळवून दिला आणि भाजीपाला विक्री केंद्राची स्थापना केली. लॉकडाउन काळात दीड लाखांचा झालेला फायदा हे उमेद अभियानाचे यश आहे."

- प्रदीप गोविंद ठाकरे, तालुका समन्वयक, सेंद्रिय शेती  

संपादन - स्नेहल कदम