esakal | पूरग्रस्त व्यापाऱ्यांना लवकरच मदत
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना लवकरच मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: चिपळूणमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने व्यापाऱ्यांना तातडीची ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, महिना उलटला तरी अद्याप ही मदत प्राप्त झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. खासदार शरद पवार यांच्यासमोर व्यापाऱ्यांचे प्रश्न व व्यथा मांडण्यात आल्या.

खासदार पवार यांनी तातडीने पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून व्यापाऱ्यांना आठ दिवसांत आर्थिक मदत दिली जाईल, असे सांगितले. पडलेल्या घरांसाठी दीड लाख, दुकानासाठी ५० हजार, तर ज्यांची घरे पाण्यात गेली, अशा कुटुंबाना सरसकट १० हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. महापुरास सव्वा महिन्याचा कालावधी लोटला तरी दमडीची मदत पूरग्रस्तांना मिळाली नाही. त्यामुळे व्यापारी व नागरिक संतप्त झाले आहेत.

पुनर्वसन विभागाच्या सचिवांसमवेत चर्चा

शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी खासदार शरद पवार यांची स्थानिक व्यापारी व पूरस्थितीविषयी काम करणाऱ्या मंडळींसमवेत गुरुवारी भेट घेतली. नुकसानभरपाईबाबत पुनर्वसन विभागाच्या सचिवांसमवेत चर्चा केली. त्यानुसार आठवड्यात मदत वाटप करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळामध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवा कार्यकर्ते अक्षय केदारी, रामशेठ रेडीज, शहानवाज शहा आदी उपस्थित होते.

वाशिष्ठीच्या पुराबाबत बैठक घेणार

यावेळी वाशिष्ठी नदीला वारंवार येणाऱ्या पुराबाबत ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज व शहानवाज शहा यांनी खासदार शरद पवार व अजित पवार यांच्यासमोर महापुराची कारणे पीपीटीद्वारे सादर केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी आठ दिवसांत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याचे जाहीर केले.

loading image
go to top