दहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा पुन्हा भगवा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

 संरपंचाचा सत्कार भरघोस निधी देऊन

रत्नागिरी : शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. निवडणुकांमध्ये विरोधक राजकारण करतील; परंतु शिवसेनेची ताकद सगळीकडे आहे. दहाच्या दहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करण्याचा संकल्प करुन सर्वजणं कामाला लागू या. निवडणुक निकालानंतर शिवसेनेच्या संरपंचाचा सत्कार भरघोस निधी घेऊन करणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

ग्रामंपचाय निवडणुकीपुर्वी शिवसेनेने रत्नागिरी तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्याची राळ उठवली. शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली वाटद येथे पहिला मेळावा झाला. त्यानंतर कोतवडे, मिरजोळे, नाचणे जिल्हा परिषद गटात प्रचार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री सामंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, जिल्हा परिषद सभापती बाबू म्हाप यांच्यासह त्या-त्या मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा- सरनाईक आणि  वायकर यांचं भुयारी गटार कलाननगरकडेच -

मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते शिवसेनेला मानणारे आहेत. मी ग्रामपंचायती निवडणुकीच्या प्रचारात असलो कींवा नाही, राज्याच्या राजकारणात व्यस्त असलो तरीही ग्रामीण भागातील शिवसेनेचा पदाधिकारी पुन्हा भगवा फडकवेल. विकासासाठी निधीची कमतरता आहे. मुख्यमंत्री यांनी नियोजनचा जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामे येत्या 15 दिवसात सुरु करण्यात येतील.

कोरोना काळात शिवसेनेमार्फत आवश्यक त्या सोईसुविधा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनतेला धिर देत मास्क, सॅनिआयझरचे वाटप करण्यात आले. मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनाही मदत केली गेली. त्याचबरोबर गावागावातील भजन, नमन मंडळांना आर्थिक ताकद देण्याचा मान रत्नागिरी मतदारसंघाने मिळवला आहे. असा प्रयोग महाराष्ट्रात कुणीही केलेला नव्हता. 

हेही वाचा- कोल्हापुरातील जुन्या राजवाड्याचे वैभव! -

याप्रसंगी तालुकाप्रमुख बंड्या साळवी म्हणाले की, रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व कायमस्वरुपी राहील. अंतर्गत गटतट केले नाहीत तर कोणीही आपल्यापुढे टिकाव धरु शकत नाही. वाटद गटात प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत जाऊन शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती पदाधिकार्‍यांनी द्या. गेल्या दहा वर्षात वाटद जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकासकामे झालेली आहेत. कोरोनातून जिल्हा सावरत आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायती निवडणुकीत काम करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे.

 

कोरोना वाढण्याची शक्यता : सामंत

रत्नागिरीत सध्या कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. गेल्या काही दिवसात दोन-तिन रुग्णच सापडत आहेत; परंतु दिवाळीत अनेक लोकं खरेदीसाठी बाहेर पडली होती. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने संयम ठेवून वागले पाहीजे, असे आवाहन सामंत यांनी केले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher and Technical Education Minister Uday Samant speech on Meet the workers