भात उत्पादकांना यंदा उच्चांकी दर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

एक नजर

  • गतवर्षीची भात खरेदी 1950 रूपये प्रतिक्‍विंटल
  • यंदाची भात खरेदी 2250 रूपये प्रतिक्‍विंटल
  • यंदा आत्तापर्यंत 17 हजार 244 क्‍विंटल भात खरेदी

कणकवली - भातशेती तोट्यात जात असल्याने भाताचे उत्पादन घेण्याऐवजी बाजारातून तांदूळ विकत घेणे शेतकऱ्यांनी पसंत केले होते. मात्र यंदा भातासाठी प्रतिक्‍विंटल 2250 रूपये एवढा दर शेतकरी संघाकडून देण्यात आला. या वाढीव दरामुळे शेतकरीराजा सुखावला आहे. हा दर यापुढेही कायम राहिला तसेच शासनाने किमान अडीच हजार रूपये एवढा हमी भाव निश्‍चित केला तर शेतीपासून दुरावलेला शेतकरी पुन्हा भातशेतीकडे वळण्याची शक्‍यता आहे.

लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजूरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर यामुळे सिंधुदुर्गातील भातशेती तोट्यात होती. पावसाळी हंगामात राबूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारातून तांदूळ खरेदी करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना भात उत्पादनातून चांगला दर मिळू लागला आहे. त्यामुळे भातशेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधवातून व्यक्‍त होत आहे.

मागील वर्षी भातखरेदीसाठी 1750 रूपये प्रतिक्‍विंटल आणि शासनाकडून प्रतिक्‍विंटलमागे 200 रूपये बोनस असा 1950 रूपये दर देण्यात आला होता. तर यंदा 1750 रूपये अधिक 500 रूपये बोनस असा 2250 रूपये प्रतिक्‍विंटल दर निश्‍चित झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील धान्य खरेदी विक्री संघामध्ये देणे पसंत केले.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 314 शेतकऱ्यांकडून 17 हजार 244 क्‍विंटल भात खरेदी संघामार्फत करण्यात आली आहे. तसेच अजूनही शेतकरी आपल्याकडील धान्यसाठा खरेदी विक्री संघाला देण्यास तयार आहेत. मात्र संघाची साठवणुकीची क्षमताच संपली आहे. तसेच मार्केटिंग फेडरेशनने शेतकरी संघाकडून भाताची उचल केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडील भात खरेदी थांबली आहे.

खासगी खरेदीदारांकडून 1200 रूपये दर
खरेदी विक्री संघाकडून 2250 रूपये दर दिला जात असताना खासगी खरेदीदारांनी गावागावात जाऊन 1200 रूपये प्रतिक्‍विंटल या दराने भाताची खरेदी केली होती. अनेक शेतकऱ्यांना शेतकरी संघाकडे मिळणाऱ्या भातखरेदी दराची माहिती नसल्याने त्यांना जादा उत्पन्नापासून मुकावे लागले.

""भातशेतीला यंदा उच्चांकी दर मिळाला ही निश्‍चितच समाधानकारक बाब आहे. शासनाने जर अडीच हजार रूपये प्रतिक्विंटल दर दिला तर अनेक शेतकरी आणि नवीन पिढी सुद्धा भात शेतीकडे वळेल. याखेरीज खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात भातशेतीमधून चांगले उत्पन्न मिळते. त्यासाठीही तयारी शेतकऱ्यांनी ठेवायला हवी.''
- किर्तीकुमार राणे,
प्रगतिशील शेतकरी जानवली

"यंदा भाताला चांगला दर मिळाला. शेतकऱ्यांनीही आपला धान्यसाठा संघाकडे आणला. त्याचधर्तीवर शासनाने गोडाऊनची उपलब्धता केली तर अधिकाधिक शेतकऱ्यांकडील भात घेऊन त्यांना चांगला दर देणे शक्‍य होणार आहे. सध्या गोडाऊनची क्षमताच संपल्याने भात खरेदी करू शकत नाही. तर भाड्याने गोडाऊन घ्यायचे तर त्याचा परतावा शासनाकडून मिळत नाही अशी शेतकरी संघाची अडचण झाली आहे.''
- विठ्ठल देसाई,
अध्यक्ष खरेदी विक्री संघ कणकवली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highest rate to Paddy in Sindhudurg