"कुणी फुटपाथ देता का फुटपाथ?' 

राजेश सरकारे
Sunday, 17 January 2021

शहरातील जानवली नदीच्या दोन्ही पुलावर गाव, शहरे, पर्यटनस्थळे आदींबाबत दिशानिर्देश करणारी कमान राष्ट्रीय महामार्ग विभागाने उभारली आहे; मात्र या कमानीचे दोन्ही खांब फुटपाथवरच रोवण्यात आले आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणांतर्गत गाव, शहरांचे दिशानिर्देश करणाऱ्या फलकाची कमान थेट फुटपाथवरच लावण्यात आली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना थेट महामार्गावरून ये- जा करावी लागणार असून यात अपघाताचीही शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर महामार्ग चौपदरीकरणाचा पंचनामा करणारा "कुणी फुटपाथ देता का फुटपाथ', असा फलक "आम्ही कणकवलीकर' संस्थेच्या सदस्यांनी लावलेला फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

शहरातील जानवली नदीच्या दोन्ही पुलावर गाव, शहरे, पर्यटनस्थळे आदींबाबत दिशानिर्देश करणारी कमान राष्ट्रीय महामार्ग विभागाने उभारली आहे; मात्र या कमानीचे दोन्ही खांब फुटपाथवरच रोवण्यात आले आहेत. फुटपाथवरील हे खांब हटवावेत यासाठी नागरिकांनी विविध माध्यमातून आवाज उठवला; मात्र महामार्ग ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येत नसल्याने अखेर "आम्ही कणकवलीकर' संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येऊन या कमानीवर "कुणी फुटपाथ देता का फुटपाथ?' असा फलक लावला आहे. आज या फलकाची मोठी चर्चा शहरात होती. 

लोकप्रतिनिधींबाबत नाराजी 
महामार्ग चौपदरीकरणाबाबत गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांनी वारेमाप आश्‍वासने दिली होती; मात्र या सर्वांची आश्‍वासने खोटी ठरली असून ही नेतेमंडळी जनतेची दिशाभूल करत आहेत. चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात असताना नागरिकांना आणखी काय काय सोसावे लागणार असाही प्रश्‍न लावलेल्या फलकातून विचारण्यात आला आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highway issue baner kankavli sindhudurg