
हा मार्ग टोलमुक्त राहण्याच्या अनुषंगाने रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशीच चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी : सागरी महामार्गासाठी १२ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही महामार्गाला शक्य तिथे ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात येणार आहे. तसेच हा मार्ग टोलमुक्त राहण्याच्या अनुषंगाने रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशीच चर्चा सुरू असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सागरी महामार्ग, दोन मेडिकल कॉलेज, मच्छीमारांचे प्रश्न सोडविले. पर्यटनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगून खासदार तटकरे म्हणाले, 'कोरोनामुळे शासन आर्थिक संकटात आहे. त्यात केंद्र सरकार आर्थिक कोंडी करत आहे. जीएसटीच्या माध्यमातून राज्याला मिळणारा निधी देण्यास केंद्र टाळाटाळ करीत आहेत. त्यात भर म्हणून निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला बसला. या अडचणीच्या काळातही राज्य शासनाने कोकणाला ६०० कोटीची मदत केली.'
हेही वाचा - कनिका गळ्यात कपडा अडकलेल्या स्थितीत आढळली
पर्यटन वाढ करणारा प्रकल्प
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काही टप्पे राहिले आहेत. यासह सागरी महार्गावर शक्य तिथे ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात येणार आहे. महामार्गाच्या ही पुढची पायरी आहे. या महामार्गावर ठराविकच फाटे असणार आहे. महामार्गावर वाहनांचा वेग १२० किमी ठेवावा लागेल. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना हरित पट्टे असणार आहेत. अतिशय आकर्षक आणि पर्यटन वाढीला मदत करणारा हा प्रकल्प आहे, अशी माहिती खासदार तटकरे यांनी दिली.
"गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यांनी केलेल्या विकासकामांपेक्षा जास्त विकास आमच्या महाविकास आघाडी सरकारने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात केला. आता केवळ विरोधाला विरोध करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे."
- सुनील तटकरे, खासदार