अवाजवी दराचे कोकणातील पर्यटन हंगामावर सावट 

प्रशांत हिंदळेकर
Tuesday, 7 May 2019

एक नजर

  • उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल
  • किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे चित्र.
  • जलक्रीडा, निवास व्यवस्थेच्या अवाजवी दरामुळे पर्यटकांमधून नाराजी.
  • दिवसभर पर्यटनाचा आनंद, मत्स्याहारी जेवणाचा आनंद लुटत पर्यटक माघारी. 
  • दराप्रमाणे अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची येथील निवास व्यवस्थेकडे पाठ. 

मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. 

दिवसभर पर्यटनाचा आनंद, मत्स्याहारी जेवणाचा आनंद लुटत पर्यटक माघारी परतत आहेत. दराप्रमाणे अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी येथील निवास व्यवस्थेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पर्यटन हंगामाची सुरवात चांगली झाली असली तरी येथे आलेल्या लाखो पर्यटकांनी किनारपट्टीसह शहरातील निवास व्यवस्थेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

येथील अवाजवी दर त्याप्रमाणात अत्यावश्‍यक सुविधा नसल्याने पर्यटकांनी कुडाळ, देवगड, कणकवली, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये निवासाचा पर्याय शोधला. याचा फटका शहरासह किनारपट्टी भागातील निवास व्यवस्थेच्या पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला. यात ज्या निवास व्यवस्थेच्या व्यावसायिकांकडे चांगल्या सुविधा आहेत अशांकडे पर्यटकांची गर्दी असल्याचेही दिसून आले. 

सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम असून पर्यटन हंगामाची सांगताही याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. गेल्या चार-पाच वर्षात स्कूबा, स्नॉर्कलिंग तसेच अन्य साहसी जलक्रीडा प्रकार हे पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिकांमधील किंमत चढाओढीमुळे पर्यटकांना म्हणावा तसा आनंद लुटता येत नाही. शिवाय काही स्कूबा अँकरच्या ठिकाणी पर्यटकांना समुद्रात खाली बुचकळविण्याचे प्रकारही घडत असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

काही स्कूबा डायव्हिंग अँकरच्या ठिकाणी माशांना खाण्यासाठी पाव टाकला जात आहे. पाव हे माशांचे खाद्य नसल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रवाळांच्या ठिकाणी असणाऱ्या रंगीबेरंगी मासळीवर होत असून ही मासळीही त्याठिकाणी फिरकत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्वी ज्या दर्जाचे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग तसेच अन्य जलक्रीडा प्रकार सुरू होते तसे आता होत नसल्याने पर्यटकांनाही त्याचे औत्सुक्‍य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. या गंभीर बाबीचा स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग तसेच साहसी जलक्रीडा व्यावसायिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मत्स्याहार महागला 
छोटी कोळंबी वगळता बांगडा, सुरमई तसेच अन्य किंमती मासळी हॉटेल व्यावसायिकांना रत्नागिरीतून आयात करावी लागत आहे. या मासळीच्या दरात मोठी वाढ झाल्याने मत्स्याहारी थाळ्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मत्स्यखवय्यांकडून सुरमई, बांगडा, पापलेट या मासळीला चांगली मागणी असल्याने या मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hike in rate affects Konkan Tourism