
ओरोस (सिंधुदुर्ग) : 'झिला झिला ये झिला'....'ओ..काय रे बाबा'...'हडे ये'...'इलय् इलय्'..असे वडील आणि मुलगा यांच्यात संभाषण होते. काही वेळातच चुडीच्या प्रकाशात डोक्यावर उलटी छत्री धरत मुलगा 'वर' बनून लग्न मंडपात एक गरोदर व अन्य एक अशा दोन होवळ्यांच्या समवेत ढोल-ताशांच्या गजरात लग्न मंडपात हजर होतो. इकडे बाप 'वधु'ला घेवून पहिलाच हजर असतो. त्यानंतर वर पिता आणि वर यांच्यात लग्ना सबंधी चर्चा होते. बापाने शोधलेल्या वधुला मुलगा वरमाळ घालतो.
लग्नानंतर नवविवाहिता देवाच्या पाया पडायला वाकते. मात्र, यावेळी तिचे वागणे नवरोबाला खटकते. नंतर नवनवरा देवासाठी नारळ ठेवण्यास वाकतो अन् नववधु त्याला ढकलते. तेथेच मोडक्या नवऱ्याचे लग्न संपते.
आंबडोस गावच्या होळीच्या मांडावरची कथा
ही कथा आहे मालवण तालुक्यातील आंबडोस गावच्या होळीच्या मांडावरची. होळीच्या चौथ्या दिवशी दशावतारी नाटक होते. या नाटकाच्या माध्यमातून होळीच्या चव्हाटयाला पूर्ण गाव उपस्थित राहून जागर करतात. त्यापूर्वी अर्धा ते पाऊण तासाचे स्थानिकांचे "अस्सल मालवणी बोली भाषेत" नाटक सादर केले जाते. हे नाटक म्हणजे पूर्वी गावोगावी काजू पिकाच्या हंगामात घडणाऱ्या घटनेवर भाष्य असते.
त्याप्रमाणे गुरुवारी रात्री हे नाटक सादर झाले. याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. मालवणीमध्ये धमाल-मस्ती करीत सादर करण्यात आलेल्या नाटकाने उपस्थितांच्या पोटात हसून हसून गोळा आला होता. मात्र, शिमग्याच्या निमित्ताने प्रत्येक गावची वेगळी प्रथा असते. वेगवेगळ्या माध्यमातून होळी उत्सव साजरा केला जातो, याचाही प्रत्यय आला.
गावची प्रथा-परंपरा
आंबडोस गावचा पाच दिवसांचा शिमगा असून पाचव्या दिवशी धूळ मारून धुळवड खेळली जाते. तिसऱ्या दिवशी ग्राम देवतेची निशाणकाठी वर्षाने गावच्या रयतेच्या भेटीला बाहेर पडते. मानकरी व पूर्ण गाव सोबत असतो. पाचव्या दिवशी पूर्ण गावाची फेरी पूर्ण झाल्यावर ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिर समोर उभारण्यात आलेल्या होळीसमोर प्रथेप्रमाणे पाच दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप होतो. याच्या आदल्या दिवशी चौथ्या रात्री जागर केला जातो. निवडक दशावतारी किंवा एकाद्या कंपनीचे नाटक सादर केले जाते. त्यापूर्वी "मोडक्या नवऱ्याचे" नाटक सादर केले जाते.
'झिला झिला ये झिला
गुरुवारी रात्री साडे दहा वाजल्यानंतर सुरु झालेले हे नाटक अवघ्या सव्वा तासात 100 टक्के मनोरंजनात्मक ठरले. होळीच्या चव्हाटयासमोर उभारण्यात आलेल्या सभा मंडपात नवऱ्या मुलाचा बाप आला. तेथे लावण्यात आलेल्या माइकद्वारे मुलाला हाक दिली. 'झिला झिला ये झिला'. अशी दोन वेळा साद घातल्यावर समोरून मुलगा 'काय रे बाबा..इलय् इलय्', असा प्रतिसाद देतो. थोड्याच वेळात ढोल ताशांचा आवाज येवू लागतो. काही वेळाने चुडतीच्या प्रकाशात गावकरी वराडी मंडळींसमवेत डोक्यावर उलटी छत्री धरून नवरा येताना दिसतो.
सोबत एक गरोदर महिला सहा वारी साडी परिधान केलेली असते. अजुन एक असते ती नववारी साडी नेसलेली असते. फटाक्यांची आतषबाजी सुद्धा सुरु असते. नवरा, त्याच्या सोबत असलेल्या दोन होवळ्या लग्न मंडपात पोहोचतात. तेथे आल्यावर मुलगा बापाला 'काय रे बाबा खेका बोलवलं' असा प्रश्न करतो. बाप सांगतो, 'तुझे लग्न ठरविलेय'.
होवया म्हणजे काय वाचा
यानंतर वरपिता व वर मुलगा यांच्यात थोडेसे संभाषण होते. याचवेळी वरमुलग्या सोबत आलेल्या दोन महिलांकडे पाहुन वडील 'ही काय भानगड हा' असा प्रश्न विचारतात. त्यावर मुलगा सहज उत्तर देवून जातो...'ही काजीतली भानगड हा'. हे संभाषण सुरु असतानाच मुलगा वडिलांना 'पोरगी बघलंस ती खय हा ?' असा प्रश्न विचारतो. पोरगी येते..पोरगी दाखविली जाते आणि लग्न सुरु होते. नियमित लग्नाप्रमाणे मंगलाष्टके म्हटली जातात. मात्र, मंत्र म्हणनारा भटजी नसतो. वधु-वर एकमेकांना वरमाळा घालतात. त्यानंतर दोन होवळ्यातील एक होवळी होवये (ओव्या) म्हणायला सुरुवात करते. या होवया म्हणजे गावातील टवाळखोरांना कान टोचनी असते. सहज बोलताना एकाद्याची फिरकी घेता येत नसेल तर यामाध्यमातून त्याच्यावर मार्मिक टिपण्णी केली गेली.
लग्नाच्या आधि ओव्यांची प्रथा
सर्रासपणे लग्नाच्या आदिच्या रात्री ओव्या गायल्या जातात. मात्र, येथे लग्न लावल्यावर ओव्या गायल्या गेल्या, हे विशेष !लग्न झाल्यावर देवाला नमस्कार करण्यासाठी नवरा-नवरी पुढे जातात. त्यावेळी नवऱ्या पेक्षा जास्त लांब पाऊल नवरीचे पडते. यावरुन नव्या नवरीच्या संस्काराची मापे काढली जातात. याचा राग 'त्या' नववधुच्या मनात असतो. त्यामुळे देवाच्या पाया पडण्यासाठी नवरा मुलगा नारळ ठेवण्यासाठी तो थोडा पुढे सरसावतो. एवढ्यात नववधु मागून त्याला जोरदार ढकलते...आणि येथेच मोडक्या नवऱ्याचे लग्न संपते. सुमारे पाऊण तास या मालवणी नाटकाने करमणूक केलीच त्याचबरोबर सिंधुदुर्गातील ग्रामीण वस्तुस्थितिवर भाष्य करून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.